गडचिरोली: आधीच्या सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आज पुन्हा एकदा गडचिरोलीत आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे पहिल्यांदाच गडचिरोलीत (gadchiroli) आले आहेत. या ठिकाणी नक्षलवाद्यांशी (naxal) दोन हात करणाऱ्या जवान आणि पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत आले आहेत. त्यांनी छत्तीसगडच्या बॉर्डरवरील जंगलात येऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच जवानांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना एकाच दगडात दोन पक्षी मारले. त्यांनी नक्षलवाद्यांना इशारा देतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नाव न घेता टोला लगावला. मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचं काम केलं म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
आपले जवान कसं काम करतात, कोणत्या परिस्थितीत करतात हे पाहिलं पाहिजे. तसेच जवानांच्या पाठी सरकार खंबीर आहे हा मेसेज गेला पाहिजे. आपले जवान आणि गृहखातं नक्षल्यांना मुँह तोड जवाब द्यायला तयार आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षात नक्षलवाद कमी होत आहे. आपले जवान काम करत आहेत. त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. आपल्याला आपल्या बॉर्डरही सेफ करायच्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या भागात पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं आहे. हा नक्षलग्रस्त भाग आहे. मी इथे आलो आहे. ज्या परिस्थितीत आपले जवान काम करत आहेत, राज्याच्या बॉर्डरचं रक्षण करत आहेत, स्वत:चा जीव धोक्याक घालत आहेत, त्यांना सण उत्सावाचा आनंद मिळत नाही, आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कर्तव्य बजावत असतात, त्यामुळे त्यांना भेटायला आलो आहे. त्यांच्याशी बोलायला आलोय. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो, असंही ते म्हणाले.
मी गेले पाच वर्ष पालकमंत्री असतानाही आपल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज मुख्यमंत्री असताना दिवाळी साजरी करायला आलो त्याचा आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.