मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी CAA समजून घ्यावा, काँग्रेसचा सल्ला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. CAA ला घाबरण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत (congress Manish Tiwari advice to Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे. (congress Manish Tiwari advice to Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्यांबाबत चर्चा झाली. “सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. तर राष्ट्रीय जनगणना नोंदणी अर्थात एनपीआरबाबत देशाची जनगणना दर दहावर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो धोकादायक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो. काँग्रेससोबत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा सुरु आहे,”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी सीएएबाबत सकारात्मक संकेत दिल्यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री मनिष तिवारी यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना सल्ला दिला.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती कायदा -2003 ची माहिती घेणे आवश्यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसंच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवं, कारण धर्म हा नागरिकत्वचा आधार असू शकत नाही”, असं मनिष तिवारी म्हणाले.
CM Maharashtra @UddhavThackarey requires a briefing on Citizenship Amendment Rules -2003 to understand how NPR is basis of NRC. Once you do NPR you can not stop NRC.On CAA-needs to be reacquainted with design of Indian Constitution that religion can not be basis of Citizenship.
— Manish Tewari (@ManishTewari) February 22, 2020
पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या CAA समर्थनाला काँग्रेसने विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे समर्थन करु नये, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना कुणी तरी समजवावे लागेल, मला संधी मिळाल्यास मी समजावेन, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
दरम्यान सीएए कायद्यासंदर्भातला निर्णय केंद्र सरकार घेणार आहे, मात्र आम्ही एनआरसी लागू होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली. “राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल पंतप्रधानांना भेटले. सोनियाजींचीही त्यांनी भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे की सीएएचा कायदा हा केंद्राचा आहे, त्याची अंमलबजावणी केंद्राकडे आहे, राज्याकडे नाही, कुणाला घाबरण्याची गरज नाही. कोणत्या प्रश्नावर लोकांना आपत्ती आहे, किंवा इतर राज्ये जिथे भाजपची सत्ता नाही, तिथे कोणते प्रश्न टाकतात, ते बघून तिन्ही पक्ष एकत्र बसून त्याबाबत निर्णय पुढे घेऊ, असं नवाब मलिक म्हणाले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“मी सीएए, एनपीआर, एनआरसीबाबत ‘सामना’त माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सीएए’ला घाबरायची गरज नाही. एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. मी माझ्या राज्यातील नागरिकांना आश्वासन दिलं आहे की कुणाचाही अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. जे मला माहित आहे ते मी बोलत आहे. एनआरसीमुळे फक्त मुस्लमांसाठी नाही तर सगळ्यांनाच लायनीत उभं राहावं लागेल. देशाची जनगणना दर दहा वर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो आक्षेपार्ह वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो”,
संबंधित बातम्या
राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला सहकार्य करा, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी