मुंबई: राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाचा उल्लेख केला होता. राज्यापालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या वक्तव्याचा धागा पकडत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलंय. ‘माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही’, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना दिलंय. ( uddhav thackeray reply to governor on kangana case)
अभिनेत्री कंगना रानौत हिने आपल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईनंतर मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच आपल्याला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचंही कंगना म्हणाली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ झाला होता. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलंच फटकारलं होतं. तुम्हाला मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर आपल्या राज्यात निघून जावं, अशी सूचनाच राऊत यांनी केली होती.
मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कंगना रानौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची 13 सप्टेंबरला भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. “मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा संपादन होईल. माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले” अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली होती.
कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईनंतर राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांनाही बोलावलं होतं. मुंबई महापालिकेनं एका दिवसात केलेल्या कारवाईबाबत राज्यपाल नाराज असल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कंगनाला भेटीसाठी आपल्या घरी बोलावलं होतं. त्यानंतर आठवले यांनीही कंगनाच्या मुद्द्यावर राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात राज्यातील प्रार्थनास्थळं उघडण्याची मागणी राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या भावना, श्रद्धा जपतानाच त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमचं प्रथम कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या:
उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले
uddhav thackeray reply to governor on kangana case