जीएसटी फसल्याचं मान्य करून रद्द करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडाडले
कोणाच्या पैशातून बिहारला फुकट लस देत आहात? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. (CM Uddhav Thackeray Criticism on Central Government GST Policy)
मुंबई : “जीएसटीची करपद्धत फसली आहे. ते पंतप्रधान मोदींनी मान्य करावं. सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे पुढे या, आपण यावर चर्चा करु,” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. कोणाच्या पैशातून बिहारला फुकट लस देत आहात? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. (CM Uddhav Thackeray Criticism on Central Government GST Policy)
“देश रसातळाला चालला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. मदत करायची आहे. पण मदत करताना पैसे कुठून आणायचे. आपल्या हक्काचे जीएसटीच्या टॅक्सचे २८ हजार कोटी आणि वरचे काही १० हजार म्हणजे एकूण ३८ हजार कोटी येणं केंद्राकडून बाकी आहे. ते देत नाहीत आणि बिहारला फुकट लस देत आहेत. कोणाच्या पैशातून देत आहात,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“पण 38 हजार कोटी देत नाहीत. मग मध्येच सांगतात राज्याने कर्ज उभारा काय म्हणून उभारायचं. नंतर सांगतात केंद्र उभारेल, फेडायचं कोणी, का म्हणून तुम्ही कर्ज उचलत आहेत आणि उचलायला लावता आहात,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“जीएसटीला शिवसेनेनं विरोध केला होता. इथला पैसा दिल्लीत जाणार आणि दिल्ली मग सर्वांना वाटणार. येत नाही पैसा. जीएसटी देऊ शकत नसाल तर दसरा मेळाव्याचा निमित्ताने सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की पुढे या आपण यावर चर्चा करु,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“जीएसटीची करपद्धत फसली आहे, तर पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे चूक मान्य करावी आणि त्यात सुधारणा करावी. नाही तर मग ही जीएसटी पद्धत बंद करुन पुन्हा जुनी करप्रणाली अस्तित्वात आणली पाहिजे. देश हा एका पक्षाची मक्तेदारी नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ”
“जीएसटीचे पैसे येत नसतील. तर मग पैसे मागायचे नाहीत का? रावसाहेब दानवे म्हणाले की लग्न तुम्ही केलं आणि पैसा बापाकडे मागता. दानवे बाप तुमचा असेल. माझा बाप इकडे आहे. तो माझ्यासोबत माझ्या विचारात आहे. मला भाडोत्री बाप स्विकारण्याची माझी तयारी नाही. भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ, माझे आई-बाप सर्व माझ्या या मातीत आहेत,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
“लग्न आम्ही केलं आहे. पण लग्न करताना बाप सोडा पण आहेराची पाकिटं ज्याला देत होतो. तो पाकिटं घेऊन पळाला. मोजतो आणि देतो म्हणाला. पण अजून मोजतोच आहे. खाल्ले की काय देव जाणे. पण आहेराची पाकिटं पळवणारे जर तुमचे बाप असतील तर ते तुम्हालाच लखलाभ,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली. (CM Uddhav Thackeray Criticism on Central Government GST Policy)
संबंधित बातम्या :
मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!
इकडे गाय म्हणजे माता, पलिकडे जाऊन खाता; हे तुमचं हिंदुत्व?: उद्धव ठाकरे