राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री
राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांनाही हे दाखवा," अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांवर केली. (CM Uddhav Thackeray Criticizes BJP)
मुंबई : “महाराष्ट्रात 65 हजार रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली. मुंबईत वाताहात झाली आहे, असे बोलणाऱ्यांना आकडे दाखवा. लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांनाही हे दाखवा,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांवर केली. (CM Uddhav Thackeray Criticizes BJP)
“काही जण आपल्याबद्दल चित्र किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान दुर्देवाने काही आपली म्हणणारी माणसं करतात. तेव्हा अत्यंत दुःख होतं. पण हे खरं असलं तरी तुमचा जो सरकारवर विश्वास आहे. म्हणून आम्ही हे काम करु शकतो,” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला.
“सद्यस्थितीत महाराष्ट्रात 65 हजार रुग्ण आहेत. यापैकी जवळपास 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काही मृत्यू झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 34 हजार कोरोना अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील 24 हजार रुग्णांना एकही लक्षण नाही. त्यांना काहीही औषधोपचाराची गरज नाही. ते क्वारंटाईनमध्ये आहेत. काही पॉझिटिव्ह असल्याने आयसोलेशनमध्ये आहे. यातील 24 हजार रुग्णांमध्ये मध्यम ते तीव्र अशा लक्षणाचे 9500 रुग्ण आहेत.
काही जण महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली, मुंबईत वाताहात झाली आहे, असे बोलणाऱ्यांना हे आकडे दाखवा. लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा असे बोलणाऱ्यांना हे दाखवा. हे आकडे बघा. हे आकडे बोलके आहेत. यातील ९५०० हे मध्यम ते तीव्र अशा लक्षण आहेत. तर १२०० जण हे गंभीर आहे. त्यातील २०० जण व्हेंटिलेटरवर आहे. ६५ हजार पैकी २८ हजार घरी गेले आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरेंकडून रेल्वेमंत्र्यांचे आभार
जवळपास 16 लाख स्थलातरित मजुरांना त्यांच्या राज्यात सोडलं आहे. 800 रेल्वे सोडल्या. यासाठी मी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना धन्यवाद देतो. त्यांनी रेल्वे उपलब्ध करुन दिल्यानेच साडेअकरा लाख मजूर प्रवास करु शकले. मागच्यावेळी मी त्यांना बोललो तर पियुष गोयल यांना राग आला होता, असेही ते म्हणाले.
सरासरी काढून अंतिम परिक्षेचा निकाल देणार
परीक्षांचं काय करायचं यावर काम सुरु आहे. मी कुलगुरुंची बैठक घेतली. सर्वांचं म्हणणं आहे की तात्काळ परीक्षा घेणं शक्य नाही. ते कुलगुरु आणि मी मुख्यमंत्री असलो तरी आमच्यातील पालक जिवंत आहे. त्याप्रमाणे आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे आपण मागील परीक्षांच्या (सेमिस्टर) निकालाची सरासरी काढून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल.
काहींना सरासरीपेक्षा आपण अधिक गुण मिळवू शकलो असतो असं वाटेल त्यांच्यासाठी आपण परिस्थितीचा अंदाज घेऊन ऑक्टोबर/नोव्हेंबर जेव्हा शक्य असेल तेव्हा परीक्षा घेण्याचाही पर्याय ठेवणार आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
संबंधित बातम्या :
CM Uddhav Thackeray LIVE | पुढच्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच देण्यास सुरुवात – मुख्यमंत्री