फडणवीस सरकारचा ‘हा’ पॅटर्न उद्धव ठाकरे कॉपी करणार?
उद्धव ठाकरेही फडणवीसांचा कित्ता गिरवत स्वतःकडे गृह मंत्रालय राखणार, की दुसऱ्यांकडे सोपवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : फडणवीस सरकारप्रमाणेच ‘मुख्यमंत्रीच गृहमंत्री’ या पॅटर्नची ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पुनरावृत्ती (Thackeray may follow Fadnavis’ footsteps) होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मिळून घेतील, असंही त्या म्हणाल्या. ठाकरे सरकारचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खातेवाटप करण्याची मागणी शरद पवार यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद वेगवेगळ्या नेत्यांकडे सोपवण्याची परंपरा होती. मात्र महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडेच ठेवली होती. फडणवीसांचं होमग्राऊण्ड असलेल्या नागपुरातच गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी वाढली होती. त्यामुळे दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या फडणवीसांना बरेच वेळा टीकेलाही सामोरं जावं लागत होतं.
आता उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचं संभाव्य खातेवाटप समोर येत आहे. मात्र गृहखातं वगळता इतर खात्यांबाबतच चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेही फडणवीसांचा कित्ता गिरवत स्वतःकडे गृह मंत्रालय राखणार, की ही महत्त्वाची जबाबदारी दुसऱ्या नेत्यावर सोपवणार, याकडे महाविकास आघाडीतील नेत्यांसोबतच सर्वसामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बैठकीला आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ
मुख्यमंत्र्यांसह सात जणांनी 28 नोव्हेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यापैकी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची चिन्हं आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार सुपूर्द केला जाण्याची शक्यता आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे पुन्हा उद्योग मंत्रालयाचीच धुरा दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा पदभार सोपवला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अधिवेशनात महाविकासआघाडीचे केवळ सात मंत्रीच दिसतील. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
Thackeray may follow Fadnavis’ footsteps