कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.
मुंबई : कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. (CM Uddhav Thackeray meeting Sharad Pawar)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.
परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीत पुन्हा कुरबुरी, आता राष्ट्रवादीची नाराजी
आधी निर्णय प्रक्रियेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे.
VIDEO : CM Meet on MVA | आघाडीतल्या कुरबुरींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चाhttps://t.co/z5w6zmtFb0
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2020
आधी काँग्रेसची खदखद
यापूर्वी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. नुकत्याच झालेल्या भेटीतील मागण्यांवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचं काँग्रेसमधील काहींचं मत आहे
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीनंतर आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिली होती. (CM Uddhav Thackeray meeting Sharad Pawar)