मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार सुप्रीम कोर्टात कमी पडलेले नाही. राज्य सरकार मराठा बांधवांच्या सोबतच आहे, अशी हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही, मग महाराष्ट्रातच का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोना, शेती, मराठा आरक्षण, राजकारण अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)
“मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत होते, तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होते. मात्र विधीमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी बहुमताने नाही, तर एकमताने निर्णय घेतला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले, ते आव्हान आपण जिंकलो, सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरु आहेत. पण पहिल्या सरकारचे वकील आपण बदललेले नाहीत, उलट नवे वकीलही नियुक्त केले, ज्या-ज्या सूचना मिळत गेल्या त्यांचे पालन केले. राज्य सरकार म्हणून आपण कोर्टात कमी पडलो नाही” असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
“मोठ्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मानली, पण ते करताना अनाकलनीय पद्धतीने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात तशी दिल्याचे माझ्या माहितीत नाही, पण गरज नव्हती ती स्थगिती दिली.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आता कोणासमोर काय आणि कशा पद्धतीने गाऱ्हाणं मांडायचे याचा आम्ही अभ्यास करत आहोत, विरोधीपक्ष नेत्यांशी मी फोनवर बोललो, ते सध्या बिहारला आहेत, पण त्यांनीही आपण सोबत असल्याची हमी दिली. इथे राजकारण हा मुद्दा नाही. त्यामुळे मराठा बांधवांनो, तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. आंदोलन जरुर करा, पण केव्हा? सरकार दाद देत नसेल तर आंदोलन करा, विनाकारण उद्रेक कशासाठी करता? आपण एकत्र आहोत” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांनी माझ्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, हे आश्वस्त केले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 13, 2020
“अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील असे मंत्रीमंडळातील अनेक मंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या संकटात आंदोलन करु नका, तुम्हाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गैरसमज पसरवू नका, एकजुटीने न्याय मिळवून देऊ” अशी हमी उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना दिली.
महत्त्वाच्या घडामोडी #uddhavthackeraylive https://t.co/t85qCvnXsF
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
पहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
‘जे विकेल तेच पिकेल’, कृषी मंत्रालय अभ्यास करुन शेतकऱ्यांना बियाणे देणार : मुख्यमंत्री
(CM Uddhav Thackeray on Maratha Reservation)