शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, आता दुजाभाव का? : मुख्यमंत्री

| Updated on: Jan 18, 2020 | 12:19 PM

शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, मात्र केंद्र सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल, तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, आता दुजाभाव का? : मुख्यमंत्री
Follow us on

सांगली : शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं, मात्र केंद्र सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल, तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. देशाची अर्थव्यवस्था कोणामुळे कोमात गेली आहे, हे तपासून पाहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray to Modi Government) दिला.

शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार निवडून आले आहेत. केंद्र सरकार हे राज्याचे पालक असले पाहिजे. मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात म्हणाले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील अनेक विकास कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटनं झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच सांगली जिल्हा दौरा होता. त्याचवेळी संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘शिव प्रतिष्ठान’च्या संभाजी भिडे यांनी ‘सांगली बंद’ची हाक दिली होती. सांगली दौऱ्याला अपशकुन करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.

‘आमचा संघ चांगलाच आहे. संघ म्हणजे टीम, जाऊद्या, नको तो वाद’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी रा. स्व. संघालाही टोला लगावला. ‘शेतकरी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘सहकार क्षेत्र मरु देणार नाही. मात्र शेतकऱ्यांचं हित हे सर्वात आधी पाहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. मात्र त्यावर ज्यांचं कर्ज आहे त्यांनाही दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा : फडणवीसांच्या ‘हायपरलूप’ला अजित पवारांचा रेड सिग्नल

‘सध्याचं सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं आहे ते सुरु ठेवणार. शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करणार’ अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगलीचे सुपुत्र जयंत पाटील यांचंही कौतुक केलं. जयंत पाटील यांनी सांगलीत उत्तम काम केलं आहे. ‘जयंतराव, तुम्ही सगळे कार्यक्रमच करुन टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचं भाषण मन लावून ऐकतो. जयंत पाटील बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते कौतुक करतात. आपल्याला गुदगुल्याही होतात. मात्र घरी गेल्यावर आणि नीट विचार केल्यावर समजतं की आपले ओरबाडे निघाले आहेत. चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यांसाठीच चांगलं काम करायचं आहे’ असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray to Modi Government) पुढे म्हणाले.