मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा भाजप शिवसेना युती होणार का? या बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांना भाजप-शिवसेना युतीबाबत (Shivsena-BJP Alliance) प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोला हाणलाय.
‘ते ज्या पद्धतीनं चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीय का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला’, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलाय. तसंच कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो पत्र चुकत असला तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल ते मला करणं भाग आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. तेव्हापासून ते अनेक महत्वाच्या प्रसंगी अनुपस्थित राहिले. हिवाळी अधिवेशन काळातही ते विधानभवनात येऊ शकले नव्हते. त्यावरुन भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पदाचा कार्यभार आपल्या एखाद्या सहकाऱ्याकडे देण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. हाच धागा पकडत मंत्रालयात कधीपासून येणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावेळी अनेकांना मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असं वाटलं नव्हतं. पुन्हा येईन असं बोलून न येणं यापेक्षा हे बरं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला हाणला.
दरम्यान, आता बराचसा मार्गावर आलोय. राजकीय नाही पण शारिरीक शक्तिपात झाला होता. मात्र आता पूर्वपदावर येत आहे. जिद्द आणि हिंमत असल्यावर काहीच अशक्य नसतं. हत्ती गेलाय, फक्त शेपूट राहिलं आहे. ते गेलं की पुन्हा मंत्रालयात येईन, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :