पार्थच्या उमेदवारीवरुन शरद पवार पुन्हा यू टर्न घेण्याच्या तयारीत?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण शरद पवार पार्थ यांच्या नावावरुन पुन्हा एकदा यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी एक संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केलंय. शिवाय […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली होती. पण शरद पवार पार्थ यांच्या नावावरुन पुन्हा एकदा यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांनी एक संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केलंय. शिवाय अजित पवार यांनीही एक संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केलं.
अजित पवार पनवेल इथे म्हणाले, मावळसाठी राष्ट्रवादीकडून अद्यापही तीन नावं चर्चेत आहेत . तर शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले की, मावळमधून पार्थ किंवा दुसराही कुणी उमेदवार असू शकतो. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.
मावळ मतदारसंघातील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शरद पवार यांच्यासमोर मत व्यक्त केलं की, बरं झालं तुम्ही पार्थला उमेदवारी दिली, त्यामुळे निकालाचे चित्र वेगळं दिसेल. त्यावर पवार म्हणाले, ”पार्थ किंवा आणखी कुणी उमेदवार असू शकतो. तुम्ही त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा. राष्ट्रवादीचे उमेदवारांवर निर्णय अजून बाकी आहेत.”
शरद पवार हे माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार होते. पण पार्थला उमेदवारी देण्याची मागणी असल्यामुळे मी माघार घेतोय, असं त्यांनी जाहीर केलं होतं. पवार कुटुंबातून सगळ्यांनीच निवडणूक लढवायची नाही, असंही ते म्हणाले होते. पार्थ पवार यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवाय अजित पवारही मावळ मतदारसंघात बैठका घेत आहेत. त्यातच पवारांच्या वक्तव्याने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय.