मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीतच तोडाफोडीचं राजकारण बघायला मिळणार? नागपूरच्या पोटात मोठं काहीतरी घडतंय
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांमध्येच आता तोडाफोडीचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. कारण नागपुरातून याबाबतच्या मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे.
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकाचं बिगूल वाजू शकतं. त्यानंतर राज्यात आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्ष राज्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी कामाला लागला आहे. प्रत्येक मतदारसंघात आपला प्रबळ उमेदवार असावा, असा प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे. असं असताना या निवनडणुकांच्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांमध्ये आता तोडाफोडीचं राजकारण बघायला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री आहेत. या दोन्ही पक्षांच्या आघाडीचं राज्यात सरकारही होतं. अर्थात आजही ते एकत्र आहेत. पण आता काँग्रेसचा एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. एक नेता आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो तेव्हा तो ज्या पक्षाला सोडतो त्या पक्षाची निश्चितच मोठी वैयक्तिक हानी होते. कारण तो नेता आपल्यासोबत शेकडो कार्यकर्ते तर नेतोच, याशिवाय पक्षाची अंतर्गत, अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन जात असतो. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा फटका मानला जातोय.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते आशिष देशमुख लवकरच नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच मेळावा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर ते हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
आशिष देशमुख मेळाव्यात पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
आशिष देशमुख यांच्या टीमकडून मेळाव्याची तयारी देखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या हिंगणा मतदारसंघातून येत्या निवडणुकीत निवडणूक लढायची, अशी आशिष देशमुख यांची इच्छा आहे. काँग्रेसवर वारंवार आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार, शरद पवार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते राष्ट्रवादीचा मोठा मेळावा हिंगणामध्ये घेणार आहेत.
आशिष देशमुख या मेळाव्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठ्या संख्येने बोलवणार आहेत. याच मेळाव्यात आशिष देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगणा मतदारसंघात भाजप विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रबळ आणि मोठा उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणासाठी प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार म्हणून आशिष देशमुख पुढे येऊ शकतात.