औरंगाबादेत किम ज्योंग उनची प्रचिती, जलील यांच्याविरोधात काँग्रेस नगरसेवकाची तक्रार
औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे की उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम ज्योंग उन निवडून आलाय असा प्रश्न पडला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार काँग्रेस नगरसेवकाने केली आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादमध्ये तुफान राजकीय राडेबाजी सुरु आहे. आता तर एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधातच गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.
इम्तियाज जलील यांनी चिरडून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अफसर खान यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत त्यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांना तक्रार दिली. अफसर खान यांच्या तक्रारीनंतर औरंगबादेत पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.
“औरंगाबादमध्ये खासदार निवडून आला आहे की उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम ज्योंग उन निवडून आलाय असा प्रश्न पडला आहे. इम्तियाज जलील यांनी माझं नाव घेऊन धमकी दिलेली आहे. त्याबाबतचा व्हिडीओ आहे. जलील यांनी पंतप्रधान मोदी, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे”, असं अफसर खान यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
“जलील यांनी विजयी रॅली घेतली. त्यावेळी केलेल्या भाषणात जलील म्हणाले, आता पाच वर्षे माझी आहेत. ज्यांनी माझ्याविरोधात काम केलं ते गद्दार आहेत. त्यांना चिरडून मारु”, असं वक्तव्य केल्याचा दावा काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी केला.
विरोधात काम करणाऱ्याला गद्दार म्हणत असाल आणि त्याला मारण्याची भाषा करत असाल, तर ही लोकशाही आहे की हुकूमशाही असा सवाल अफसर खान यांनी केला.
मी पोलीस आयुक्तांकडे, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, आता लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार देणार असल्याचं खान यांनी सांगितलं.