सेना-राष्ट्रवादीचा आश्वासनपूर्तीवर भर, आता काँग्रेसनेही करावं, मिलिंद देवरांचं सोनिया गांधींना पत्र
शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यावर भर दिला आहे, याकडे मिलिंद देवरांनी पत्रातून लक्ष वेधलं आहे
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. देवरा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारला त्यासंबंधी सूचना करण्याची विनंती (Milind Deora Letter to Sonia Gandhi) केली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असं मिलिंद देवरा यांचं म्हणणं आहे.
मार्च 2019 मध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक रॅली दरम्यान गरिबांना 500 स्क्वेअर फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होतं. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये या आश्वासनाचा समावेश करण्यात आला आहे, याची आठवणही देवरांनी पत्रातून करुन दिली आहे.
महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी, अशी देवरांची मागणी आहे.
केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असं मिलिंद देवरा यांना वाटतं.
मिलिंद देवरा हे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे देवरांच्या मागणीवर सोनिया गांधी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. देवरांच्या आधी संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी होती.
मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्यातील अंतर्गत वाद सर्वांना परिचित आहे. संजय निरुपम यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे. शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून सरकार स्थापन केल्याबद्दल त्यांनी अनेक वेळा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आता मिलिंद देवरा यांनीही कठोर भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Milind Deora Letter to Sonia Gandhi)