मुंबई: वादग्रस्त प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांची जागा आता मला द्या, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यासाठी हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहले आहे. (Congress leader Haribhau Rathod seeks Sanjay Rathod forest ministry)
या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी सध्या रिक्त असलेल्या वनमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असे हरिभाऊ राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकासआघाडीत लगेचच वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु झाले होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल. मंत्रिमंडळ विस्तारात वनमंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्याचं नाव निश्चित करतील, त्यालाच वनमंत्री पदाची लॉटरी लागेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, वनमंत्रिपद मिळावं यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं कळत आहे. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का यासाठी प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे.
आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. मात्र, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात असल्याने उद्धव ठाकरे यांना राठोड यांचा राजीनामा अखेर मंजूर करावा लागला.
संबंधित बातम्या :
संजय राठोड यांचा राजीनामा, आता वनमंत्रिपदाची धुरा कोणाला?
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास पुढचे पर्याय काय?; वाचा सविस्तर
(Congress leader Haribhau Rathod seeks Sanjay Rathod forest ministry)