काँग्रेस हे बुडतं जहाज, त्यात बसणारे सगळे राष्ट्रवादीसारखे बुडतील : पंतप्रधान मोदी
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली तिसरी सभा नांदेडमध्ये झाली. या सभेतून त्यांनी नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यापासून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाआघाडीतील पक्षांवरही हल्लाबोल केलाय. काँग्रेस हे टायटॅनिकसारखं बुडतं जहाज आहे आणि या जहाजात बसणारे सर्व मित्र पक्ष राष्ट्रवादीसारखे बुडतील, असा टोलाही मोदींनी लगावलाय. “सैन्याच्या व्यवहारातही काँग्रेसने कमिशन खाल्लं” काँग्रेस […]
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातली तिसरी सभा नांदेडमध्ये झाली. या सभेतून त्यांनी नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यापासून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाआघाडीतील पक्षांवरही हल्लाबोल केलाय. काँग्रेस हे टायटॅनिकसारखं बुडतं जहाज आहे आणि या जहाजात बसणारे सर्व मित्र पक्ष राष्ट्रवादीसारखे बुडतील, असा टोलाही मोदींनी लगावलाय.
“सैन्याच्या व्यवहारातही काँग्रेसने कमिशन खाल्लं”
काँग्रेस देशात दोन प्रधानमंत्री करण्याच्या मनस्थितीत आहे. एक भारतात आणि दुसरा काश्मीरमध्ये, तुम्हाला हे आवडेल का? असा सवाल मोदींनी जनतेला केला. पाकिस्तानकडून पैसे घेऊन फुटीरतावाद पासरवणाऱ्याशी चर्चा करा असं काँग्रेस म्हणते. देशद्रोह हा कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. जाहीरनाम्यात आश्वासन दिलंय हे तुम्हाला आवडलंय का? या काँग्रेसने देशाच्या शहीद जवानांवरती प्रश्न उपस्थित केला, हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले. देशातील दहशतवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद ही सर्व काँग्रेसची देण आहे, असा घणाघात मोदींनी केला.
देशात भ्रष्टाचार निर्माण करणारी आणि ते वाढवणारी काँग्रेस आहे. जितका मोठा व्यवहार तेवढी मोठी मलाई हे काँग्रेसचं तत्व आहे. इटलीचा मिशेल मामा, ज्याला यांनी पळून जायला मदत केली, त्याला दुबईतून या चौकीदाराने उचलून आणलं. त्याच्या चार्जशीटमध्ये स्पष्ट लिहिलंय की कमिशन खाल्लंय. येत्या काळात तुमची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. आज अनेक नामदार पारिवारिक लोक जामिनावर बाहेर आहेत आणि अनेक लोक कोर्ट-कचेरीच्या जाळ्यात अडकलेत, असंही मोदी म्हणाले.
“काँग्रेस हे बुडतं जहाज”
2014 ला कांग्रेस 44 वर आली. आता यावेळी संकट आणखी वाढणार आहे. दुर्बीण घेऊन काँग्रेसच्या नामदारने एक अशी जागा शोधून काढलीय आणि तिथून ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अमेठीच्या लोकांनी त्यांचा झालेला हा अपमान लक्षात ठेवावा. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रॅलीत त्यांचा झेंडा शोधावा लागत होता. काँग्रेस म्हणजे टायटॅनिक जहाज आहे, जे हळूहळू डुबतंय. या जहाजात बसणारे सर्व जण राष्ट्रवादीसारखे बुडणार आहेत, असा घणाघात मोदींनी केला.
हिंगोलीचे खासदार निवडणूक लढवत नाहीत, प्रफुल्ल पटेल लढवत नाहीत, शरद पवार लढवत नाहीत, या सगळ्यांनी मैदान सोडलंय. इतकी भेसळ असलेला ही आघाडी महाराष्ट्राचा विकास करेल का? आपल्याला माहिती आहे. कशा पद्धतीने आदर्श घोटाळा केला होता. तुम्हाला माहिती आहे ना हे कोणी केलं होतं? शहिदांच्या कुटुंबीयांचा अपमान केला होता. त्यामुळेच आम्ही रेरा कायदा आणला आणि सगळं बदललं आहे. काळा पैसा या व्यवसायात होता तो पूर्ण थांबला, असं मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका
काँग्रेसचं ढकोसलापत्र (जाहीरनामा) आलंय, यात कुठेही मध्यमवर्गीयाच्या हिताच्या दृष्टीने कुठलीच घोषणा केलेली नाही. गरज पडली की काँग्रेस खोट्या घोषणांची पेटी खोलते आणि काही दिवसांनी गजनी बनते. मागे ते म्हणाले शेतकऱ्यांच्या दारात जाऊन हमीभावाने त्यांचं उत्पादन विकत घेऊ, पण यांनी मंडीतून सुद्धा उत्पादन विकत घेतलं नाही. ते पुन्हा गजनी झाले. देशातल्या मध्यमवर्गाला 10 टक्के आरक्षण देण्याचं काम या चौकीदाराने केलं. चौकीदार सबका साथ सबका विकास यासाठी काम करत आहे, असं सांगत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.
ओबीसी आयोगाला आम्ही घटनात्मक दर्जा दिला. हे काम काँग्रेस कधीच करू शकली नव्हती. फाळणीच्या वेळी काँग्रेसने ठरवलं असतं तर करतारपूर साहेब यांची समाधी देशात असली असती. पण काँग्रेसमुळे करतापूर पाकिस्तानात गेलं. नांदेड आणि अमृतसर हवाई वाहतुकीने आम्ही जोडलं, पण हे काँग्रेस करू शकली नाही. गुरुगोविंद सिंग यांच्या 550 व्या जन्मदिवस जोरात साजरा करण्याची आम्ही तयारी केली आहे. मागच्या वेळी तुम्ही मतं दिल्यामुळे मी देशाची काम करण्याची पद्धत बदलली. 2019 मध्ये मी देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. मागच्या मतावर मी दहशतवादाला उत्तर देऊ शकलो, यावेळी मत दिलं तर मी थेट दहशतवाद संपवून टाकेन. त्यामुळे यावेळी तुम्ही कमळाला मत दिलं तर ते मत थेट मोदीला मिळणार आहे, असं म्हणत ‘मैं भी चौकीदार, गांव गांव चौकीदार’ या घोषणेने मोदींच्या भाषणाचा समारोप झाला.