सोलापूर, माढ्यात आघाडीला धक्का, आणखी एका बड्या नेत्याचा भाजप प्रवेश ठरला
सोलापूर : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्के देणं सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख होती. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का […]
सोलापूर : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्के देणं सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये (सोलापूर, माढा) प्रभाव असणारे काँग्रेस नेते कल्याण काळे यांचा भाजपप्रवेश निश्चित झालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कल्याण काळे यांची ओळख होती. शिंदे हे स्वतः काँग्रेसकडून सोलापूरचे उमेदवार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
”पक्षात घुसमट होत होती. अनेक वर्षे पक्षाने फायदा घेतला. मात्र काँग्रेसमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवू शकलो नाही. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया कल्याण काळे यांनी दिली.
कल्याण काळे यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार संजय शिंदे आणि सोलापूरचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपाने काँगेस राष्ट्रवादीला धक्के देण्याचे सुरूच ठेवलं आहे. सोलापुरात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत कल्याण काळे?
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष
माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम
सोलापूर, माढ्यात आतापर्यंत आघाडीला भाजपचे धक्के
लोकसभेपूर्वी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला मोठे धक्के दिले आहेत. 2014 ला मोदी लाटेतही निवडून आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. हा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला. त्यांच्यानंतर वडील विजयसिंह मोहिते पाटलांनीही भाजपचं काम करणार असल्याचं जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शेकडो पदाधिकाऱ्यांसह मोहिते कुटुंबाने भाजपचा हात धरला. दुसरीकडे काँग्रेसलाही धक्का देत भाजपने फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या गोटात घेण्यात यश मिळवलं. निंबाळकरांना माढ्यातून भाजपने उमेदवारी दिली आहे.
2014 ला सुशील कुमार शिंदेंना सोलापुरातून पराभव स्वीकारावा लागला होता. पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकीकडे त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे, तर भाजपनेही सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासारखे बडे नेते सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.