सोनिया, इंदिरा गांधींनाही भूरळ पाडणाऱ्या नंदूरबारमधून सलग 45 वर्ष विजयी; माणिकराव गावितांचे हे किस्से माहीत आहेत काय?
नंदुरबार जिल्हा राज्यासह देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वाचा...
नंदुरबार : महाराष्ट्र… देशाच्या राजकारणातील मैलाचा दगड. देशाच्या सत्तेची गणितं महाराष्ट्राच्या राजकारणाला डावलून पूर्ण होत नाहीत. अगदी जवाहर नेहरूंपासून इंदिरा गांधीपर्यंत (Indira Gandhi) सर्वांनाच महाराष्ट्र कायम खुणावत राहिला… याच महाराष्ट्रातील काही मतदारसंघ तर अर्धशतकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिले. त्यातीलच एक म्हणजे नंदूरबार… या मतदार संघाविषयी आणि साडे चार दशकं नंदूरबारचं राजकारण आपल्या भोवती फिरवत ठेवणाऱ्या माणिकराव गावितांविषयी (Manikrao Gavit Passed Away) जाणून घेऊयात…
इंदिरा गांधी आणि नंदूरबार
निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी विविध नवनवी धोरणं अंमलात आणायच्या. पण एक परिपाठ त्यांनी कधी बदलला नाही. तो म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात. इंदिरा गांधी कायम नंदूरबार जिल्ह्यातून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायच्या. ते त्यांनी कायम ठेवलं.
सोनियांची पहिली सभा
सोनिया गांधी आणि नंदूरबारचंही विशेष नातं आहे. सोनिया गांधी यांची पहिली सभा याच नंदूरबारमध्ये झाली. त्यांच्या राजकीय प्रवेशाआधी त्यांनी नंदूरबारमध्ये सभा घेतली होती.
गावितांचं नंदूरबार
माणिकराव गावित यांचा नंदूरबारच्या राजकारणावर कायम दबदबा राहिला. त्यांनी 9 टर्म नंदूरबारचे खासदार राहिले. दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. आदिवासी समाजाचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांनी संसदेत मांडल्या. तसंच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध राहिले.
गावितांचं निधन
माणिकराव गावित यांचं निधन झालंय. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. उद्या (रविवार) नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.