उस्मानाबादमध्ये काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंसह डझनभर नेते शिवसेनेत
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी देखील काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांसह राजीनामे दिले आहेत. हे सर्व हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे दिसत आहे.
उस्मानाबाद: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी देखील काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांसह राजीनामे दिले आहेत. हे सर्व हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेसचा जिल्ह्याचा सेनापतीच फोडल्याने भूम परंडा आणि वाशी तालुक्यात काँग्रेसचा गड ढासळणार आहे.
संबंधित काँग्रेस नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश करतील. त्यापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिल्याची माहिती प्रशांत चेडे यांनी दिली. काँग्रेसच्या चेडे परिवाराचे परंडा मतदारसंघात मोठे प्रस्थ आहे. पंचायत समिती, नगर पालिका आणि बाजार समिती यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था चेडेंच्या ताब्यात आहेत. मात्र, आता त्यावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते.
काँग्रेसचे परंडा तालुकाध्यक्ष सुभाषसिंह सिद्धीवाल, भूमचे अण्णासाहेब देशमुख आणि विजयसिंह थोरात, वाशीचे विभीषण खामकर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री खंडागळे आणि सुनील जाधवर, वाशीचे नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी सभापती अण्णासाहेब देशमुख, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि बाजार समितीचे अनेक संचालक शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेतृत्वाने केवळ निवडणुकीपुरता वापर करून कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोपही या नेत्यांनी केला.
काँग्रेसची एक मोठी फळी शिवसेनेत जाणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.