अजित पवार गटात जाणार का? झिशान सिद्दीकी म्हणाले “मला वरिष्ठांबद्दल…”
आता 'टीव्ही 9 मराठी'ने झिशान सिद्दीकी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांसोबत जाण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले.
Zeeshan Siddique On Joining NCP : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आता लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे बोललं जात आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोललं जात आहे. झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडणार की नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ आज मुंबईत असणार आहे. या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी झिशान सिद्दीकी यांनी बॅनरबाजी आहे. तसेच झिशान सिद्दीकी हे देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आता ‘टीव्ही 9 मराठी’ने झिशान सिद्दीकी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांसोबत जाण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले.
“वांद्र्यातील सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतील”
“अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही वांद्रे पूर्व या माझ्या मतदारसंघातून जात असेल तर ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच दर महिना त्यांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. याच कारणामुळे आम्ही सर्व अजित पवारांचे आभार मानण्यासाठी वांद्र्यातील सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांचे आभार मानतील”, असे झिशान सिद्दीकी म्हणाले.
“आपली जबाबदारी आहे की आपण…”
“अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते महायुतीचे असो किंवा महाविकासआघाडीचे, जर ते एखादं चांगलं काम करत असतील तर आपली जबाबदारी आहे की आपण त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचे आभार मानावे”, असेही झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.
मतदारसंघात न्याययात्रा काढूनही मला बोलवलं जात नाही
यावेळी झिशान सिद्दीकी यांना अजित पवार गटाबरोबर जाण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी अजूनही काँग्रेससोबतच आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली न्याययात्रा काढली होती. मला याबद्दल वरिष्ठांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती. मला वरिष्ठांबद्दल कोणतीही तक्रार किंवा समस्या नाही. पण माझ्या मतदारसंघात न्याययात्रा काढूनही मला बोलवलं जात नाही, याचे मला दु:ख आहे”, असे झिशान सिद्दीकी म्हणाले.
“सध्या काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातून नामांकन अर्जही देण्यात आले आहेत. तो नामांकन अर्ज घेण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवलं होतं. पण त्यांनी हा अर्ज मला देता येणार नाही, असे सांगितलं. त्यामुळे त्यांचा मेसेज खूप स्पष्ट आहे. आता मला याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे आणि माझ्यासाठी जनता बसलेली आहे. ती याबद्दलचा निर्णय घेईल”, असेही झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.