खातेवाटपावरुन काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवर नाराज?
विरोधीपक्ष नेतेपद भूषवल्यानंतर दुय्यम खाती पदरी पडल्याने काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार खट्टू असल्याचं बोललं जातं.
नागपूर : मंत्र्यांच्या निवडीआधी, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणि आता खातेवाटपानंतरही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनामा सुरुच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा विजय वडेट्टीवार खातेवाटपावरुन नाराज असल्याची माहिती (Minister Vijay Wadettiwar Unhappy) आहे.
विजय वडेट्टीवार यांच्याकडे ‘इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन’ या मंत्रायाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र या खात्यांवरुन वडेट्टीवार समाधानी नसल्याची चर्चा आहे.
विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष मागास प्रवर्ग कल्याणाची जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली. परंतु वडेट्टीवार यांना ‘हेवी वेट’ खात्यांची अपेक्षा असल्याचं म्हटलं जातं. विरोधीपक्ष नेतेपद भूषवल्यानंतर दुय्यम खाती पदरी पडल्याने वडेट्टीवार खट्टू असल्याचं बोललं जातं.
भाजपने फोडाफोडीसाठी फोन केलेल्या आमदाराचं नाव वडेट्टीवारांनी फोडलं
दोन दिवसांपासून विजय वडेट्टीवार यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. खातेवाटपाची यादी जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळेच वडेट्टीवारांच्या मनात खदखद असल्याचं बोललं जातं. आज वडेट्टीवार मंत्रिपद स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे.
विजय वडेट्टीवार हे विदर्भातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वात विदर्भात काँग्रेसने 16 जागा जिंकल्या होत्या.
राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेही भाजपात गेले. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
कोण आहेत विजय वडेट्टीवार?
- विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत.
- काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे ते सदस्य आहेत
- विजय वडेट्टीवार यांनी 80 च्या दशकात एनएसयूआयमधून राजकीय कारकीर्द सुरु केली
- 1991 ते 93 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
- 1998 ते 2004 या दरम्यान त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी भूषवली.
- 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
- 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते.
- 2009-10 मध्ये ते पुन्हा चिमूरमधून निवडून आले.
- 2010 मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं.
- 2014 मध्ये वडेट्टीवार पुन्हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले.
- 24 जून 2019 रोजी त्यांची निवड महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदी झाली.
(Minister Vijay Wadettiwar Unhappy)