ठाकरे गटाला दुसरा सर्वात मोठा झटका, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचा दावा; कुणाकडे केली मागणी?
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच ठाकरे गटातून मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या दोन्ही विधान परिषदेच्या सदस्या शिंदे गटात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ दोनने कमी झालं आहे.
नागपूर, दिनांक 13 जुलै 2023 : राज्यात गेल्यावर्षापासून राजकीय भूकंपावर भूकंप होत आहेत. राजकीय पक्ष एकमेकांना धक्क्यावर धक्के देत आहे. आधी शिवसेना फुटली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. त्यानंतर विधान सभेतील संख्याबळ कमी झाल्याने विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही गेलं. राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद आलं. पण राष्ट्रवादीही फुटल्याने आता हे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेनेचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसच्या एका आमदाराने या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावाच केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच ठाकरे गटातून मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या दोन्ही विधान परिषदेच्या सदस्या शिंदे गटात आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ दोनने कमी झालं आहे. त्यामुळे काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. अभिजीत वंजारी यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांना पत्र लिहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा करण्याची मागणी केली आहे. हायकमांडकडे तसा प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली आहे. काँग्रेसच्या या दाव्याने महाविकास आघाडीत धुसफूस वााढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ते आठ, आम्ही नऊ
विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. ठाकरे गटाचे तीन सदस्य त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेत आमची संख्या जास्त झाली आहे. विधानपरिषदेत आमची संख्या जास्त, आमचे नऊ, ठाकरे गटाचे आठ आमदार असल्याने काँग्रेसला विरोधीपक्ष नेते पद मिळायला हवं, अशी मागणी वंजारी यांनी केली आहे.
कायदा काय सांगतो?
ज्याची संख्या जास्त त्यांचा विरोधीपक्ष नेता, हा कायदा आहे, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. अभिजीत वंजारी यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील, के सी वेणयुगोपाल यांना पत्र लिहून हायकमांडकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगण्याची विनंती केली आहे. काँग्रेसच्या या दाव्यामुळे अंबादास दानवे यांची नाराजी वाढण्याची शक्यता आहे.