Rajeev Satav Death | महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त, मोठा धक्का बसलाय : शरद पवार
(Rajeev Satav Death Sharad Pawar )
मुंबई : राजीव सातव (Rajeev Satav Death) यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या 24 दिवसांपासून राजीव सातव कोरोनाशी झुंज देत होते. त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र, त्यानंतर सायटोमॅजिलो या विषाणूची लागण झाल्याने त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. (Congress MP Rajeev Satav Death NCP Chief Sharad Pawar Daughter Supriya Sule express Grief)
शरद पवार काय म्हणाले ?
शरद पवार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
राजीव सातव माणुसकी जपणारा नेता : सुप्रिया सुळे
राजीव सातव यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. pic.twitter.com/P7DaIRw3tw
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
(Congress MP Rajeev Satav Death NCP Chief Sharad Pawar Daughter Supriya Sule express Grief)
कोण होते राजीव सातव?
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होतं. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर बोलत असायचे.
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राज्यसभेवर वर्णी
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली होती.
संबंधित बातम्या :
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशी
गांधी कुटुंबाचा निष्ठावान नेता, राहुल गांधींचा विश्वासू मोहरा, कोण होते राजीव सातव?
राजीव सातव यांच्या शरीरात आढळलेला सायटोमॅजिलो व्हायरस नेमका काय? धोका कुणाला?
(Congress MP Rajeev Satav Death NCP Chief Sharad Pawar Daughter Supriya Sule express Grief)