खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, 23 दिवसांपासून व्हेटिंलेटरवर
काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे : काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असलेल्या राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. (Congress MP Rajeev Satav health update from pune jehangir hospital He is stable and still on ventilator support)
मागील आठवड्यातच राजीव सातव यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याशिवाय काँग्रेस नेत्यांनीही डॉक्टरांच्या भेटीनंतर सातव यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं.
23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: पुण्यातील डॉक्टरांशी फोनवरुन चर्चा केली होती. राजीव सातव यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावेत, यासाठी राहुल गांधी यांनी बरेच प्रयत्न केले होते.
कोरोनाची लक्षणे
19 एप्रिलपासून राजीव सातव यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 23 एप्रिलपासून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 28 तारखेपासून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण
कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याची माहिती राजीव सातव यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवरुन दिली होती. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून संपर्कातील सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.
After experiencing mild symptoms, I’ve tested positive for COVID.
All those who have been in contact with me recently, please follow all safety protocols.
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) April 22, 2021
कोण आहेत राजीव सातव?
45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी आहेत, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. (Rajyasabha MP Rajeev Satav Corona Positive Health Update from Pune Hospital)
चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार
हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
राज्यसभेवर वर्णी
राजीव सातव यांनी स्वतःहून 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून सातव यांची खासदारपदी वर्णी लागली.
(Congress MP Rajeev Satav health update from pune jehangir hospital He is stable and still on ventilator support)