राज ठाकरेंसाठी महाआघाडीचे दरवाजे कायमचे बंद
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. कोल्हापूरसाठी धनंजय महाडिक, बारामती सुप्रिया सुळे, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, रायगड सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने […]
मुंबई : काँग्रेसने महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. कोल्हापूरसाठी धनंजय महाडिक, बारामती सुप्रिया सुळे, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, रायगड सुनील तटकरे यांची अपेक्षेप्रमाणे नावं पहिल्या यादीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील 48 पैकी 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यातील 10 जागांवर उमेदवार आणि हातकणंगलेच्या जागेवर राजू शेट्टींना पाठिंबा राष्ट्रवादीने जाहीर केला.
मनसेलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत घेऊन महाआघाडी तयार करावी, असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव होता. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटही घेतली होती. पण काँग्रेसचा मनसेला तीव्र विरोध होता. अखेर मनसेसाठी प्रस्तावित असलेल्या दोन जागांवरही राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत. ईशान्य मुंबई आणि कल्याण मतदारसंघ मनसेसाठी सोडला जाणार असल्याची चर्चा होती. पण राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेची ताकद चांगली असल्याने ही जागा मनसेसाठी प्रस्तावित होती. काँग्रेसने ताठर भूमिका घ्यावी लागल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीमध्ये जाता आलं नाही. मनसेने अजून लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय.
कल्याणमध्ये 2014 ला राष्ट्रवादीकडून माजी खासदार आनंद परांजपे उमेदवार होते. ते दोनवेळा शिवसेनेकडून निवडून आले होते. सध्या आनंद परांजपे हे ठाण्यात राष्ट्रवादीकडून सक्रिय आहेत. एकंदरीत शिवसेनेसमोर राष्ट्रवादी कमी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. कल्याण लोकसभेत मनसेचीही ताकत आहे. कारण, या भागात राजू पाटील सक्रीय आहेत. कल्याण लोकसभेत शिवसेनेला भाजप टक्कर देताना दिसून येत आहे. डोंबिवलीचे भाजचे आमदार, राज्य मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. ही ताकद कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकीत दिसून आली होती.
2014 च्या निवडणुकीत काय झालं?
2014 च्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर मनसेकडून राजू पाटील अशी तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीअगोदर विजयाविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. 16 मे 2014 रोजी झालेल्या मतमोजणीत शिवेसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 2 लाख मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला चीतपट केलं, तर मनसेचा धुव्वा उडवला. राष्ट्रवादी आणि मनसेला पहिल्या दोन फेऱ्या वगळता एकाही फेरीत पाच आकडी संख्या गाठता आली नाही.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने हॅट्ट्रिक करत राष्ट्रवादी आणि मनसेचा धुव्वा उडवला होता. तब्बल दोन लाख मतांची विक्रमी आघाडी घेत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी आनंद परांजपे यांना चीतपट केलं. या निमित्ताने कल्याणच्या मतदारांनी शिवसेनेला कौल दिल्याने कल्याणची शिवसेना आणि शिवसेनेचे कल्याण हे समीकरण प्रत्यक्षात उतरले. या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आणि कल्याण लोकसभेत शिवसेनेने विजयाचा झेंडा रोवला.
शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 40 हजार 892, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 1 लाख 90 हजार 143, मनसेचे प्रमोद पाटील यांना 1 लाख 22 हजार 349 मते पडली. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी 2 लाख 50 हजार 749 मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
राष्ट्रवादीची यादी
राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – NCP) उमेदवार यादी :
- रायगड – सुनील तटकरे
- बारामती – सुप्रिया सुळे
- सातारा – उदयनराजे भोसले
- बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
- जळगाव – गुलाबराव देवकर
- मुंबई उत्तर-पूर्व – संजय दीना पाटील
- कोल्हापूर – धनंजय महाडिक
- परभणी – राजेश विटेकर
- ठाणे – आनंद परांजपे
- कल्याण -बाबाजी पाटील
- हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा
- लक्षद्विप – मोहम्मद फैजल