नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार मागच्या अडीच वर्षांपासून सत्तेत आहे. या अडीच वर्षांच्या काळात या न त्या कारणावरुन तिन्ही पक्षांत वादंग दिसून आले, कुरबुरीही झाल्या आणि आरोप-प्रत्यारोही झाले. मात्र, आता थेट शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी बंड पुकारला असून 35 आमदारांना घेऊन ते सुरतमध्ये गेले आहेत. हे ऑपरेशन लॉटस तर नाही ना, याही अँगलनं या राजकीय घडामोडीकडं बघितलं जातंय. आता राज्यात महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागलेला असताना ठाकरे सरकारचे संकटमोचक चिंतेत दिसतायत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे संपर्कात असल्याचं सांगितलं. मात्र, हे सांगताना राऊत अस्वस्थ दिसले. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उत्तर दिलंय. विशेष म्हणजे यावर पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात टोलवल्याचं दिसून आलं. शरद पवार नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या…
उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. माझी अडीच वाजता मिटिंग आहे. त्यानंतर मी मुंबईला जाणार आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. ते कुठे आहेत हे सुद्धा मला माहीत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. आज दुपारी आम्ही डेप्थ स्टडी करू. त्यानंतर संध्याकाळी बौलू असा मला सेनेकडून निरोप आला आहे, असं पवार म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्यामुळे पवार यांनी शिवसेनेचा वाद शिवसेना पक्षप्रमुख्यांच्याच कोर्टात टोलवल्याचं दिसतंय.