या 10 दिग्गजांचा अमित शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित?
राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे, तर काँग्रेसही पक्षांतर्गत संघर्ष करत आहे. त्यातच भाजपमध्ये हे नेते गेल्याने दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 1 सप्टेंबर रोजी सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप अमित शाहांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश (Congress NCP leaders in BJP) होणार आहे. सध्याच्या माहितीनुसार, किमान 10 नेते भाजपचा झेंडा हाती (Congress NCP leaders in BJP) घेणार आहेत. राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांपासून गळती सुरु आहे, तर काँग्रेसही पक्षांतर्गत संघर्ष करत आहे. त्यातच भाजपमध्ये हे नेते गेल्याने दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.
या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता
खासदार उदयनराजे भोसले
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी सोडणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवस्वराज्य यात्रेकडेही त्यांनी पाठ फिरवली होती, शिवाय त्याचवेळी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. भाजपात गेल्यास उदयनराजेंना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. त्यामुळे होणारी पोटनिवडणूक विधानसभेसोबतच घ्यावी, अशी उदयनराजेंची इच्छा आहे.
रामराजे निंबाळकर
विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरही भाजपात जाणार असल्याची माहिती आहे.
पाटील पिता-पुत्र
उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील (NCP Rana jagjitsinh patil) आणि त्यांचे वडील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Dr. Padmasinh Patil) भाजपचा झेंडा हाती घेण्याचे संकेत आहेत. ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे. शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी मानल्या जाणाऱ्या पाटील यांनी पक्ष सोडल्यास मराठवाड्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जाईल.
आमदार बबन शिंदे
माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांना भाजपमध्ये एंट्री मिळत नसल्याचंही बोललं जात होतं. पण भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी माढ्यातून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला.
धनंजय महाडिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा भाजपशी जवळीक आहे.
हर्षवर्धन पाटील
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष आहे. गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यावेळी त्यांची भाजपची वाट धरल्याची माहिती आहे.
आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अक्कलकोट
आपण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी थेट गावात जाऊन संवाद साधत आहोत. मतदारसंघात आणखी फिरणं बाकी आहे. मात्र सत्तेत असलो, तर मतदारसंघातील कामं होतात, असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगत आमदार सिद्धाराम म्हेत्रेंनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं.
आमदार जयकुमार गोरे
काँग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी जाहीरपणे भाजपसाठी काम केलं होतं.
राणे कुटुंब पक्षासह भाजपात जाणार
नारायण राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच भाजपात विलिन करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच त्यांचे दोन्ही चिंरजीव निलेश आणि नितीश राणेही भाजपात जातील.