सोलापूर : भाजपाची मेगाभरती झाली मात्र त्या मेगाभरतीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांचा (BJP Waiting MLA) भाजपप्रवेश झालाच नाही. तिन्हीही आमदारांची खूप चर्चा झाली खरी मात्र त्यांचा अद्याप भाजपप्रवेश (BJP Waiting MLA) रखडला आहे. हे तिघेही आमदार सध्या मुंबईत देव पाण्यात ठेऊन पक्षप्रवेशासाठी युतीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
अक्कलकोटचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे,पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके,माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांचा अद्याप प्रवेश न झाल्याने ते स्वपक्षासाठीही परके होण्याची चिन्हं आहेत.
देशात आणि राज्यात 2014 मध्ये सुरु झालेल्या मोदी लाटेचा झंजावात अद्यापही सुरु आहे. या लाटेत मतदारांनी काहींना दूर केलं तर काही जण सत्तेच्या आसपासही आता फिरकत नाहीत. रोज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिलेदार भाजप आणि शिवसेनेच्या गोठत सामील होत आहेत. त्यात सोलापूर जिल्हाही मागे कसा राहणार, जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील,दिलीप सोपल, रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर अक्कलकोटचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सिद्धाराम म्हेत्रे,पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके,माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि तसे तिघांनी संकेतही दिले.
सिद्धाराम म्हेत्रे
भारत भालके
बबन शिंदे
तीन आमदारांची धाकधूक
ते तिघेही आमदार सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. माढा आणि शिवसेना मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. अद्याप युतीचा निर्णय झाला नाही. त्यामुळे युती झाली तर सेनेकडून माढा ऐवजी पंढरपूरची जागा भाजपला सुटणार का, या द्विधा मनस्थितीत आमदार भारत भालके आणि आमदार बबन शिंदे आहेत. तर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध होत आहे. त्यामुळे ते तिघेही मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र युतीची घोषणा झाली नसल्यामुळे या तिघांना भाजपच्या पक्षनेतृत्वाने तूर्तास होल्डवर ठेवलं आहे. त्यामुळे या तिघांची धाकधूक वाढली आहे.
एकीकडे भाजपच्या पक्षप्रवेशासाठी आतूर असलेल्या या तिन्ही आमदारांच्या अशा भूमिकेमुळे त्यांच्या मूळपक्षात सुद्धा कमालीची नाराजी पसरली आहे. मात्र ते कोणत्याही पक्षात गेले काय, राहिले काय, शेवटी या तिघांचे भवित्यव्य ठरवणार आहेत ते मतदारच.