‘महासेनाआघाडी’ नावाला आक्षेप, ‘हे’ नाव द्या, काँग्रेसचा प्रस्ताव
'महासेनाआघाडी' किंवा 'महाशिवआघाडी' या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी 'महाविकासआघाडी' असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवला आहे
मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तीन पक्षांच्या आघाडीला दिलेल्या नावावरुन नाराजी असल्याची चर्चा आहे. ‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या माध्यमांनी ठेवलेल्या नावाला काँग्रेसचा आक्षेप आहे. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने ठेवल्याची माहिती (Congress Objects MahaSena Aaghadi Name) आहे.
‘महासेनाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ या नावातून केवळ शिवसेना या एकाच पक्षाचं नाव अधोरेखित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख होत नाही. सर्वच पक्षांच्या नावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्याऐवजी कोणाचंच नाव समाविष्ट करु नये. त्याऐवजी ‘महाविकासआघाडी’ असं नाव ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या जोडगोळीला ‘आघाडी’, तर शिवसेना-भाजपच्या एकत्रिकरणाला ‘युती’ संबोधलं जात असे. हळूहळू त्यात घटकपक्षांचा समावेश झाल्यानंतर ‘आघाडी’ची ‘महाआघाडी’ झाली, तर ‘युती’ची महायुती. शिवसेनेने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत ‘आघाडी’च्या गोटात एन्ट्री केली. ही आघाडी अद्याप चर्चेच्या पातळीवर असली, तरी प्रसारमाध्यमांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे नामकरण केलं आहे. ‘महासेनाआघाडी’, ‘सेना महाआघाडी’ किंवा ‘महाशिवआघाडी’ अशी विविध नावं या आघाडीला मिळाली. त्यामुळे नेते आणि सोशल मीडियावरही ही नावं प्रसिद्ध झाली.
राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची काल पाच तास बैठक झाल्यानंतर आज पुन्हा बैठक होत आहे. आधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरु झाली. या बैठकीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नसीम खान, नितीन राऊत, मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली. या बैठकीत काय झालं, त्याबाबत मी बोलणार नाही. त्यांनी काही निर्णय घेतल्याचं मला समजलं. त्यावेळी माझ्याशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी फोनवरुन चर्चा केली’, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.
मुंबईत तिन्ही पक्षांची बैठक होणार आहे. डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात मजबूत सरकार स्थानापन्न झालेलं दिसेल. एक डिसेंबरच्या आधी मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असंही संजय राऊत (Congress Objects MahaSena Aaghadi Name) म्हणाले.