शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं?
सत्तेत सहभागी व्हायला हवं अशी काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे हे आज दुपारी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. खर्गे हे जयपूर अथवा दिल्ली येथून ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस (Congress supports Shiv Sena) अनुकूल आहे. आधीच 44 पैकी 40 आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असं पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केवळ सत्तेत सहभागी व्हायचं की नाही यावर काँग्रेस नेत्यात (Congress supports Shiv Sena) चर्चा सुरू आहे. त्याचा निर्णय लवकरच होणार आहे.
सत्तेत सहभागी व्हायला हवं अशी काँग्रेस आमदारांची इच्छा आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे आज दुपारी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. खर्गे हे जयपूर अथवा दिल्ली येथून ही घोषणा करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची मागणी 33% सत्तेची आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात समान सत्ता वाटप व्हावं अशी काँग्रेस नेते आणि आमदार यांची मागणी आहे. त्याचप्रमाणे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असावेत आणि यापैकी एक उपमुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळावं अशीही काँग्रेसच्या आमदारांची मागणी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
काँग्रेसची दिल्लीत बैठक
काँग्रेसच्या कार्यकारिणीची दिल्लीत बैठक झाली. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस वरिष्ठांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावलं आहे. त्यानंतर आज पुन्हा दुपारी चार वाजता काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय होईल.
काँग्रेसचे 40 आमदार सेनेला पाठिंबा देण्यास तयार
काँग्रेसचे सर्व आमदार राजस्थानातील जयपूरमध्ये आहेत. काँग्रेसचे तरुण आमदारा सुरुवातीपासूनच शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूने होते. आता 44 पैकी तब्बल 40 आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहेत. तसं पत्र या आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं आहे.
राष्ट्रवादीचा निर्णय काँग्रेसच्या घोषणेनंतर
दरम्यान, आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीतही सत्तास्थापनेबाबत खलबतं झाली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय राष्ट्रवादीने काँग्रेसच्या निर्णयानंतर जाहीर करण्याचं ठरवलं आहे. काॅंग्रेसचे नेते पुन्हा 4 वाजता बैठक घेतील, त्यामुळे काॅंग्रेसचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय जाहीर करणार नाही. पर्यायी सरकार निर्माण करणे ही आमची जबाबदारी आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. शरद पवार मुंबईत आहेत, ते दिल्लीला जाणार नाहीत. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करु, असं नवाब मलिक म्हणाले.