महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे कॉंग्रेस नाहक बदनाम, राहुल गांधींची नाराजी, सोनियांनी अहवाल मागवला
मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. (Congress Rahul Gandhi Param bir Singh)
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या दिल्ली हायकमांडनी महाराष्ट्रातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होत असल्याची पक्षश्रेष्ठींची भावना आहे. (Congress Rahul Gandhi Sonia Gandhi unhappy with Maharashtra Political happenings after Param bir Singh letter bomb)
काँग्रेसच्या दिल्लीश्वरांनी आजच्या आज बैठक घेऊन अहवाल मागवला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस नाहक बदनाम होतंय, ही हायकमांडची भूमिका आहे.
काँग्रेसची गुपचिळी
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारसे बोलताना दिसत नाहीत.
काँग्रेस प्रभारींनी अहवाल मागवला
दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचं काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असं थोरात यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
परमबीर सिंहांच्या लेटरबॉम्बनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली; हायकमांड अॅक्टिव्ह
काँग्रेसचाही राष्ट्रवादीच्या सुरात सूर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही- बाळासाहेब थोरात
(Congress Rahul Gandhi Sonia Gandhi unhappy with Maharashtra Political happenings after Param bir Singh letter bomb)