पवार, मोदींसारखे दिग्गज नाशकात, पण काँग्रेसला चेहराच मिळेना
नाशिकमध्ये काँग्रेसवर (congress seeking candidates) उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचं (congress seeking candidates) वर्चस्व होतं. पण कालांतराने नाशिकमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.
नाशिक : राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाजपसह राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी राज्यभर दौरे सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही नाशिकचा दौरा केला. पण याच नाशिकमध्ये काँग्रेसवर (congress seeking candidates) उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचं (congress seeking candidates) वर्चस्व होतं. पण कालांतराने नाशिकमध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय.
1962 ला भारत-चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून पाठवण्याची वेळ आली, त्यावेळी ज्या नाशिक जिल्ह्याने यशवंतरावांना भरभरुन मतदान केलं, त्याच नाशिक जिल्ह्यात आज काँग्रेस अक्षरशः लयास आली आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची धामधुम सुरु आहे, तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांनीच नाशिककडे पाठ फिरवल्याने नाशिकमधे काँग्रेसला उमेदवार देखिल सापडत नाही अशी परिस्थिती आहे.
1952, 1962, 1963, 1967, 1971, 1980, 1984, 1991, 1998 इतकी वर्ष नाशिकमधून काँग्रेसचा खासदार दिल्लीत गेला. तर स्वातंत्र्यानंतर अनेक आमदार नाशिक जिल्ह्याने काँग्रेसच्या पदरात टाकले. मात्र गेल्या काही वर्षांत नाशिकच्या मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची ओळख होती. याच नाशिकमधून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना जेव्हा केंद्रात जायची वेळ आली, तेव्हा खासदार झाले. तत्कालीन सर्वपक्षीय उमेदवारांची समज घालून काँग्रेसने यशवंतरावांना बिनविरोध केंद्रात पाठवलं. यावरुनच हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला अशी म्हण दिल्लीच्या राजकारणात प्रचलित झाली. त्यानंतर सातत्याने झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा गड म्हणूनच नाशिककडे पाहिलं गेलं.
2014 च्या निवडणुकीपासून काँग्रेसला जी घरघर लागली, ती आजही कायम आहे. यावेळी तर त्यापेक्षाही भीषण परिस्थिती आहे. एक-एक करुन काँग्रेसचे राज्यातले आणि केंद्रातले नेते भाजपच्या गळाला लागले. त्यात काँग्रेसचे वर्षानुवर्ष चालत आलेले अंतर्गत वाद आणि वैयक्तिक हेवेदावे यामुळे पक्ष रसातळाला तर गेलाच, मात्र आज नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या मतदारसंघात काँग्रेसला सक्षम उमेदवारच मिळेनासा झालाय.
दुसरीकडे नाशिकमधून कधीकाळी डी. एस. आहेरांच्या रुपाने एकच खासदार असलेल्या भाजपाचे जिल्ह्यात 4 आमदार आहेत आणि यंदा तर भाजप 15 जागांपैकी 10 जागांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस कार्यालयात एकीकडे शुकशुकाट असताना दुसरीकडे भाजप कार्यालयात निवडणुकीची लगबग सुरु देखिल झाली आहे. नेत्यांच्या सभा, बैठका, बूथप्रमुखांना सूचना या कामांवर सध्या जोरदार काम सुरु असल्याचं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अक्षरशः दशा झाली. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ याच्या प्रचाराला अनेक काँग्रेस नेत्यांनी सरळसरळ दांडी मारल्याचं दिसून आलं. मात्र पक्ष नेत्यांकडून त्याकडे स्पष्टपणे डोळेझाक केली गेली. पक्ष रसातळाला जात असतानाही वरिष्ठ नेते स्वतःच्या जागा वाचवण्यात आणि स्थानिक नेते अजूनही एकमेकांचे पाय खेचण्यात लागलेले असल्याने काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवरही वाईट वेळ ओढावली आहे.