उद्या मुंबई गुजरातमध्ये नेली तर नवल नाही, नाना पटोले शिंदे-भाजपवर संतापले

| Updated on: Sep 14, 2022 | 12:29 PM

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरल्या जात आहेत, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय.

उद्या मुंबई गुजरातमध्ये नेली तर नवल नाही, नाना पटोले शिंदे-भाजपवर संतापले
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवण्यात आल्याने भाजप सरकारवर चहुबाजूंनी टीका होतेय. मनसे नेते राज ठाकरे यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्र्यांवर या विषयावरून सडकून टीका केली आहे. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते असे करतायत. आपल्या राज्यातलं पाणी गुजरातला पाठवलं. प्रकल्प पाठवले, उद्या मुंबई (Mumbai) गुजरातला नेऊन ठेवली तर नवल वाटायला नको, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय.

‘शिंदे हे मोदी-शहांचे हस्तक’

सांगलीत साधूंना मारहाण झाल्यावरून नाना पटोले यांनी भाजप आणि शिंदे सरकारला धारेवर धरलं. कोरोना काळात पालघरमध्ये साधूंना मारहाण झाल्याचा गवगवा भाजपने केला होता.

पण आता भाजपचे गृहमंत्री आहेत. भाजपचे हिंदु सम्राट म्हणवून घेणारे सत्तेत आहेत.. कारण मुख्यमंत्री हे मोदी शहांचे हस्तक आहेत, हे त्यांनीच मान्य केलंय. त्यांच्याच राज्यात असं घडत असेल तर हे कोणाला तोंड दाखवणार? असा सवाल नाना पटोलेंनी केलाय.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. मलाईचे खाते मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. राज्यात पालकमंत्री नाहीत. अनेक ठिकाणच्या सामान्यांसाठीच्या योजना रखडल्या आहेत. सरकारला मोदी-शहांचं हस्तक बनून रहायला आवडतं, आणि राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडलेलं चालतं..  असा टोमणाही नाना पटोलेंनी लगावला.

‘भाजप लोकशाही विकत घेतंय’

गोव्यातील काँग्रेसमधील 8 आमदार भाजपात येण्याचं वृत्त आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, गोव्यात काय घडतंय, याबद्दल मला माहिती नाही. मात्र भाजप सध्या लोकशाहीच विकत घ्यायला निघालंय. झारखंड, बिहारमध्ये आमदार विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून भाजपमध्ये अस्वस्थता आहे. तेव्हापासूनच काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या बातम्या पसरल्या जात आहेत, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय.