अंतुलेंनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही, पवारसाहेबांनी मला शेतीचं वेड लावलं : सुशीलकुमार शिंदे
अंतुलेंनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही पण त्याच काळात पवारसाहेबांनी मला शेतीचं वेड लावलं, अशा आठवणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवल्या. | SushilKumar Shinde
सोलापूर : तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले (A R Antule) यांनी मला मंत्रिमंडळात घेतलं नाही पण त्याच वेळी शरद पवारसाहेबांनी (Sharad pawar) मला शेतीचं वेड लावलं. अगदी सोलापुरात (Solapur) मला शेती घ्यायला लावली. एखाद्याला पुढे रेटायचंच म्हटल्यावर पवारसाहेबांचा हात यात कुणीच धरु शकत नाही, अशा भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी बोलून दाखवल्या. (Congress Sushilkumar Shinde On Sharad Pawar)
सोलापुरात आज एक विशेष कृषी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय जडणघडणीत पवारांचा वाटा किती मोठा राहिलेला आहे, याची उजळणीच केली.
माझ्या राजकीय आयुष्यात पवारसाहेबांचा मोठा वाटा
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 1978 साली आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस वगैरे असं काही नव्हतं. काँग्रेस म्हणून आम्ही सगळे एकत्रित होतो. यावेळी मला पवारसाहेबांचं प्रचंड मार्गदर्शन लाभलं. पवारसाहेबांनीच मला राजकारणात आणलं. माझ्या राजकीय आयुष्यात साहेबांचा मोठा वाटा आहे, अशी भावना सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्या.
पवारसाहेबांनी मला शेतीचं वेड लावलं
शरद पवारांनी मला शेतीचं वेड लावलं. मला शेती घ्यायला लावली. शेतीवर प्रेम करायला शिकवलं. आधी माझ्याकडे 12 एकर शेती होती. परंतु नंतर शेतीचं वेडं लागल्यावर शेती वाढवली. आता माझ्याकडे 34 एकर शेती आहे, असं त्यांनी सांगितलं.
…त्याबाबत पवारांचा हात कुणीही धरणार नाही
शरद पवार एखाद्याला रेटायचे, पुढे घेऊन जायचे म्हटल्यावर त्यांचा याबाबतीत कुणीही हात धरु शकत नाही. माझ्यावर पवारसाहेबांचं प्रचंड प्रेम आहे. आम्हा सगळ्यांना शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. पवारसाहेबांनी एकदा का मनावर घेतलं की ते बरोबर कार्यक्रम करतात, असंही ते म्हणाले.
आमच्या नात्यात कधीच अंतर पडलं नाही
ज्यांनी मला राजकारणात आणले त्यांच्या मांडीला मांडी लावून दिल्लीत बसता आलं, त्यांच्यासोबत काम करता आलं, त्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पवारसाहेबांच्यात आणि माझ्यात ताटातूट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण आम्ही आमची मैत्री एवढी घट्ट होती की आमच्या नात्यात कधीच अंतर पडलं नाही, अशा आठणवी शिंदे यांनी जागवल्या.
शरद पवार दिलदार राजकारणी
शरद पवारांनी मला तिकीट दिले. तसंच तिकीट दिल्यानंतर मला निवडणुकीला 20 हजार रुपये देखील दिले होते. उरलेले 4 हजार रुपये मी त्यांना परत दिले होते. असे पवार दिलदार राजकारणी आहेत. शरद पवार यांच्यासारखा नेता मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे, असं सरतेशेवटी सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे यांचं खुमासदार भाषण
(Congress Sushilkumar Shinde On Sharad Pawar)
हे ही वाचा :
पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट