काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार; महाविकास आघाडीवर काय परिणाम?
खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र देऊन भूमिका सांगितलीय. तसेच या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना पत्रात देण्यात आल्यात.
मुंबईः काँग्रेस येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर नारा दिला असून, काँग्रेस या निवडणुका एकट्यानं लढवणार आहे. काँग्रेसनं आपलं धोरण जाहीर केलंय. तसेच स्थानिक पातळीवर तडजोडी करण्यास मज्जाव करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पत्राद्वारे सर्व जिल्हा प्रभारींना आदेश दिलेत. महाविकास आघाडी असूनही काँग्रेसने पहिल्यांदा अधिकृत भूमिका जाहीर केल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून आश्चर्य व्यक्त
विशेष म्हणजे राज्यात तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीची सत्ता असतानाच काँग्रेसनं स्वबळाची भूमिका घेतल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येती महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेत.
नाना पटोलेंचं काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र
खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्षांना पत्र देऊन भूमिका सांगितलीय. तसेच या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर तडजोडी न करण्याच्या स्पष्ट सूचना पत्रात देण्यात आल्यात.
नाना पटोले वारंवार स्वबळाची भाषा करत आहेत
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार स्वबळाची भाषा करत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असंही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे मुंबई महापालिका, पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेसनं असा पवित्रा घेतल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेय.
शिवसेना, राष्ट्रवादीचे काय?
महाआघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काय करणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये आघाडी होणार का याचीही चर्चा रंगत आहे. मात्र, काल सातारा जिल्हा बँक निवडणुकीत झालेला प्रकार पाहता शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे ही शक्यता कमी वाटते.
युतीच्या चर्चेला हवा
काँग्रेसच्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळात भाजप-शिवसेना युती होणार का, या चर्चेलाही हवा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही पक्षात तूर्तास वाढलेला दुरावा पाहता, हे एवढे सहज आणि सोपे नाही. त्यामुळे युतीची शक्यता तशी धुसरच आहे, पण आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हे पाहता आगामी निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये युती होण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र, त्याासाठीही भाजप राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांप्रती असलेली भूमिका, कशी यावर निर्णय घेऊ शकते.
इतर बातम्याः
नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत, मारेकऱ्यांना अटक करा म्हणत संतापलेले नागरिक रस्त्यावर!