… तर राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटलांचा प्रचार करणार नाही, काँग्रेसचा इशारा
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापुढे काँग्रेसला सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास कल्याण लोकसभेमध्ये महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे काम करणार नसल्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविवारी 31 मार्चला कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीची नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे […]
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापुढे काँग्रेसला सन्मानजनक वागणूक न मिळाल्यास कल्याण लोकसभेमध्ये महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे काम करणार नसल्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
रविवारी 31 मार्चला कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीची नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील उपस्थित होते. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय दत्त आणि काँग्रेस पक्षाच्या इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.
एकीकडे आघाडी म्हणायची आणि दुसरीकडे अशा प्रकारची अपमानजनक वागणूक द्यायची हे कदापी सहन केले जाणार नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या सहकार्याची गरज नसेल, तर आम्हाला काही हरकत नाही. राष्ट्रवादीकडून अशाच प्रकारची वागणूक मिळत राहिल्यास कल्याण लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा आम्ही प्रचार करणार नाही, असा थेट इशाराही पोटे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, रविवारी झालेली महाआघाडीची नियोजन बैठक कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे चांगलीच गाजली. त्यात आता काँग्रेसच्या या इशाऱ्याची भर पडल्याने बाबाजी पाटील यांच्यासमोरील अडचणीत भर पडली आहे.
पाहा व्हिडीओ: