कोल्हापूर – राज्यातलं राजकीय वातावरण अधिक गरम होतं आहे. त्यातचं आज कागलमध्ये (kagal) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या पोस्टरवरून नवा वाद सुरू झाला आहे. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) लागलेल्या एका बॅनरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या नावासोबत प्रभु श्री रामाचे नाव जोडण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कागलचे भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatage) यांनी आज अखंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढला. विशेष म्हणजे बॅनरवरती त्यांनी एकेरी उल्लेख केल्याचं देखील म्हटलं आहे. कागलमध्ये काढलेल्या मोर्च्यात भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हसन मश्रीफ यांच्यावरती तक्रार दाखल करणार असल्याचे देखील समरजित घाटगे यांनी सांगितले आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या पोस्टरबद्दल आपल्याला माहिती अजिबात नव्हती. वाढदिवसानिमित्त ती जाहीरात माझ्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे या जाहीरातीशी माझा संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
10 एप्रिलला रामनवमी देशात उत्साहात साजरी करण्यात आली. त्या दिवशी हसन मुश्रीफ यांचा सुध्दा वाढदिवस असतो. हसन मुश्रीफ यांना अनेक कार्यकर्त्यांनी बॅनर आणि वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरमधील कागलमध्ये अधिक जाहिराती देण्यात आल्या. एका जाहीरातीमध्ये हसन मुश्रीफ यांच्या यांच्या नावासोबत प्रभु श्री राम यांचे नाव जोडण्यात आले होते व राम नवमीच्याही शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. त्यालाच आता कागलमधील भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आज कागलमध्ये भाजपचे नेते समरजित घाटगे नेतृत्त्वात भाजपने मोर्चा काढला आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील या प्रकरणावर आज प्रत्युत्तर दिले आहे. “मागच्या 50 वर्षांपासून मी रामनवमीला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते पोस्टर, वर्तमानपत्रातून मला शुभेच्छा देतात. आता ज्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. ते पोस्टर तर मी बघितलेल सुध्दा नाही. त्या पोस्टरशी माझा काडीचाही संबंध नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हे पोस्टर कदाचित चुकीचे असेलही मात्र उगीचच हे प्रकरण वाढवून समाजाचे ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.