सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याच प्रचाराचा भाग म्हणून फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्यातच पक्षातील ‘विसंवाद’ दिसून आला.
माढा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी संवाद मेळाव्यास उपस्थित होते. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते शेखर गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केला. किंबहुना, शरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर जाण्यासही शेखर गोरे यांनी आधी नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप शेखर गोरे यांच्या समर्थकांनी केला.
विशेष म्हणजे, शेखर गोरे यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी हुज्जत घातली. शरद पवार हात पकडून शेखर गोरे यांना समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तरीही शेखर गोरे ऐकत नव्हते. अखेर त्यांनी त्या मेळाव्यातूनच काढता पाय घेतला.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्वत: शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, फलटणमधील प्रकारामुळे पक्षांतर्गत नाराजीही समोर आली.