Kunal Tilak :’लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी बांधली’, राज ठाकरेंचा दावा; वादानंतर टिळक परिवाराची भूमिका काय?
राज यांच्या दाव्यानंतर आता नवा वाद उफाळून आला आहे. छत्रपतींची रायगडावरील समाधी टिळकांनी बांधली नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि काही इतिहासाचे अभ्यासक म्हणत आहेत. या वादावर आता लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी महत्वाची भूमिका मांडली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारच्या औरंगाबादेतील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीवाद (Casteism) वाढला, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तसंच ‘रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली ती आमच्या लोकमान्य टिकळांनी (Lokmanya Tilak) बांधली. लोकमान्य टिकळांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय, मराठा… हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत’, असा दावा राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद उफाळून आला आहे. छत्रपतींची रायगडावरील समाधी टिळकांनी बांधली नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि काही इतिहासाचे अभ्यासक म्हणत आहेत. या वादावर आता लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी महत्वाची भूमिका मांडली आहे.
‘टिळक परिवारातील कुणीही आजपर्यंत असा कुठलाही दावा केला नाही’
काल जी राज ठाकरेंची सभा झाली. ती सभा खूप मोठी होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केलाय. त्याला आमचा आक्षेप नाही. पण टिळक परिवारातील कुणीही आजपर्यंत असा कुठलाही दावा केला नाही. पण राज ठाकरे यांच्या एका वाक्यामुळे जी काही सोशल मीडियावर, फेसबुक, ट्विटरवर टिळकांचा अपमान केला जातोय, टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जातेय. पण एका वाक्यामुळे टिळकांच्या कार्याचा अपमान व्हावा, ब्राह्मण द्वेष व्हावा हे काही बरोबर नाही, असं कुणाल टिळक म्हणाले.
‘टिळकांना राजकारणात ओढलं जातंय’
लोकमान्य टिळकांना राजकारणात ओढलं जात आहे. काही समाजातील घटकांनी ब्राह्मण द्वेष पुढे आणला आहे. कुठल्याही संदर्भाशिवाय अनेक मुलाखतीत हे लोक काहीही बोलत आहेत. लोकमान्य टिळकांनी जी रायगड समाधी समिती स्थापन केली, 1895 साली टिळकांनी एका लेखात असं लिहिलं की महाराजांच्या वशंजांना, सर्व संस्थानिकांना केसरीतून पत्र लिहिलं की आपण महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत काय करत आहोत? त्यानंतर मे 1895 मध्ये पुण्यातील सेनापती दाभाडे यांनी एक बैठक बोलावली होती. टिळकही तिथे उपस्थित होते. आऊंचे पंतप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती. तिथे एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्याचे मेंबर टिळक होते. त्या कमिटीचा उद्देश हा होता की महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार करण्यासाठी त्यावर एक छत्री उभारण्यासाठी आपण निधी गोळा केला पाहिजे. खरं तर त्या लोकांना असं वाटलं की शाहू महाराजांच्या मनात आलं तर ते एकटेच हा सर्व खर्च उचलतील. पण लोकमान्य टिळक, दाभाडे अशा सर्वांच्यात मनात आलं की आपण संपूर्ण महाराष्ट्रातून निधी गोळा केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला महाराजांच्या समाधी आपलीशी वाटेल म्हणून निधी उभा केला. त्यानंतर 15 मार्च 1896 रोजी तीन दिवसांचा शिवजयंती उत्सव रायगडावर लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याला ब्रिटिशांनी परवानगी नाकारली होती. या तीन दिवसांच्या उत्सवासाठी लोकमान्य टिळक रायगडावरुन महाबळेश्वरला गेले. एका रात्रीत ते महाबळेश्वरला जाऊन गर्व्हनर ऑफ बॉम्बे लॉर्ड सॅन्डर्स यांना भेटले. त्यांना विनंती केली. त्यांना सांगितलं की काही ब्रिटिश अधिकारीदेखील महाराजांची प्रेरणा घेऊन समाधीसाठी मदत करत आहेत. त्यानंतर त्यांनी परवानगी दिली, असं कुणाल टिळक यांनी सांगितलं.
‘एका वक्तव्यामुळे वाद योग्य नाही’
राज ठाकरे यांचा कुठला हेतू होता असं मला वाटत नाही. त्यांच्या विधानात काही चूक झाली असू शकते. मात्र, त्या एक विधानामुळे सोशल मीडिया, माधम्यांमधून लोकमान्य टिळकांचा अपमान करणं योग्य नाही. त्यामुळे टिळक परिवार म्हणून मी महाराष्ट्रातील जनतेला विनंती करतो की हा विषय इथेच थांबवावा. आपण संशोधन करुन, प्रत्येक पुरावे पुढे घेऊन. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही महात्मा फुलेंचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. समाधी लोकमान्यांनी बांधली की महात्मा फुलेंनी बांधली असं आम्ही म्हणत नाहीत. आमचं असं म्हणणं आहे की लोकमान्य टिळकांनी जो निधी गोळा केला तो डेक्कन बँकेत जमा केला. त्याचे पुरावे 1899 च्या केसरीमध्येही आहेत. त्यांनी जवळजवळ 20 हजार रुपये जमा झाले ते अकाऊंट खोलून डेक्कन बँकेत जमा केले. त्यावर सरकारकडून मिळणाऱ्या प्रॉमिसरी नोट्सही विकत घेतल्या होत्या. त्यानंतर ती बँक दिवाळखोरीत गेली. पुढे टिळकांनी सरकारला विनंती केली आम्ही जो निधी गोळा केला आहे तो तरी आम्हाला परत द्या, म्हणजे आम्ही आमचं काम पुढे नेऊ शकू. त्यावेळी ते काही झालं नाही. पुढे ब्रिटिशांनी समाधी बांधली, पण टिळकांनी आणि सेनापती दाभाडे यांनी समाधी कशी असावी, असं सांगितलं होतं, त्यानुसार ती बांधली गेली, असं दिसून येतं.
महाराजांची समाधी बांधण्यासाठी टिळकांनी घेतलेला पुढाकार पुरेसा नाही का?
जितेंद्र आव्हाड जे म्हणाले की पवारांनी निधी जमा केला पण एक विट रचली नाही. तरी या पूर्ण समाधी समितीचं, ब्रिटिशांमध्ये, महाराजांच्या वंशजांमध्ये, सर्व सरदार, संस्थानिकांमध्ये समन्वय घडवून आणण्यात टिळक अग्रेसर होते. टिळकांनी यात पुढाकार घेतला. टिळकांनी 1895 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रे मार्केटमध्ये एक सभा घेतली. ज्यात सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि मदन मोहन मालविय यांसारख्या दिग्गजांनी शिवाजी महाराजांनी काय काय केलं आणि त्यातून कशी प्रेरणा आपल्याला घेता येईल हे सांगितलं. राष्ट्रीय स्तरावर महाराजांचं कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न टिळकांनी केला, त्यात पुढाकार घेतला, एवढं काम पुरेसं नाही का? असा माझा प्रश्न आहे, असंही कुणाल टिळक म्हणाले.