इंदापूर नगराध्यक्षांच्या मुलाच्या लग्नासाठी रातोरात रस्ता तयार
पुणे : अलीकडील काळात लग्न सोहळा म्हटलं की शाही थाट, मानपान, जेवणावळी आणि लग्नातला बडेजाव या गोष्टींची चर्चा होत असते. मात्र, सध्या इंदापूर शहरात एका लग्नाची वेगळ्याच कारणानं चर्चा रंगू लागली आहे. ही चर्चा आहे इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मुलाच्या आणि नगरसेवक भरत शहा यांच्या पुतण्याच्या लग्नाची. त्याचं कारण म्हणजे, लग्नाच्या आधी एकाच रात्रीत नगराध्यक्षांच्या […]
पुणे : अलीकडील काळात लग्न सोहळा म्हटलं की शाही थाट, मानपान, जेवणावळी आणि लग्नातला बडेजाव या गोष्टींची चर्चा होत असते. मात्र, सध्या इंदापूर शहरात एका लग्नाची वेगळ्याच कारणानं चर्चा रंगू लागली आहे. ही चर्चा आहे इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मुलाच्या आणि नगरसेवक भरत शहा यांच्या पुतण्याच्या लग्नाची. त्याचं कारण म्हणजे, लग्नाच्या आधी एकाच रात्रीत नगराध्यक्षांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचं झालेलं काम.
दोन दिवसांपूर्वी इंदापूर शहरात इंदापूरचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या मुलाचे, नगरसेवक भरत शहा यांच्या पुतण्याचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. त्याआधी नगराध्यक्षांच्या घराकडील रस्ता एका रात्रीत करण्यात आला. विशेष म्हणजे हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. परिसरात दुचाकीही चालवता येणार नाही असे अनेक रस्ते आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. मात्र, हे रस्ते दुरुस्त न होता ज्या ठिकाणी नगराध्यक्षा राहतात त्या ठिकाणचा रस्ता रातोरात कसा तयार झाला, अशी चर्चा रंगू लागली आहे. अनेक दिवस मागणी होऊनही जे काम झालं नाही, ते काम नगराध्यक्षांच्या मुलाच्या लग्नानिमित्त झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे.
‘नगराध्यक्षांचा मनमानी कारभार, सत्तेचा दुरुपयोग’
विरोधकांनी आता या मुद्द्यावर रान पेटवायला सुरुवात केली. विविध पक्षांनी नगराध्यक्षा आणि नगरपालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरले आहे. नगराध्यक्ष मनमानी कारभार करत असून सत्तेचा उपयोग स्वतःसाठी करुन घेत आहेत, असा आरोप भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष रंजना शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांना या रोडसंदर्भात विचारले असता त्यांनी शहरात अनेक कामे सुरु असून त्याचाच तो भाग असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, शहरात रस्त्यावरील फक्त खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. असे असताना नगराध्यक्षा राहतात त्याठिकाणी पूर्णपणे डांबरी रस्ता तात्काळ कसा आणि का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांच्या मुलाच्या लग्नात झाडे वाटून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यातून वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न केले. ही बाब कौतुकास्पद असली, तरी याची चर्चा न होता लग्नाच्या आधी रातोरात रस्ता कसा तयार झाला याचीच चर्चा अधिक रंगत आहे.