ठाणे : भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला. त्याच भ्रष्टाचारच्या पैशातून त्यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला, असा गंभीर आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला (Corruption Allegations on Sudhir Mungantiwar). अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे गटनेते आणि नगरसेवक आशिष दामले यांच्या बदलापुरातील “दादास” जिमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले, “सर्वात आधी सुधीर मुनगंटीवार यांच्या घराची चौकशी करायला हवी. ईडीची पहिली नोटीस त्यांनाच पाठवायला हवी. सुधीर मुनगंटीवार याचं घर तब्बल 500 कोटी रुपयांचं आहे. मी स्वतः त्यांचा तो बंगला पाहिला. या बंगल्याच्या 5 व्या मजल्यावर पार्किंग आहे. रोपट्यांना एसी आहे. कलर कॉम्बिनेशनसाठी किचनचीही खास जोडणी केली आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीतील इतका पैसा भ्रष्टाचार आहे. याची पाळंमुळं खोदली पाहिजे.”
मिटकरी यांच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “33 कोटी वृक्ष लागवड काही वनविभागाने केलेली नाही. यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. माझ्यावर नीच प्रवृत्तीचेच लोक आरोप करू शकतात.” आरोप करताना एक तरी पुरावा आहे का? असाही सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
अमोल मिटकरी यांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रावादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मागील काळात वारंवार महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका झाली आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडूनही मुनगंटीवर यांना लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जात आहे.