एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, ‘हे ‘ प्रकरण पुन्हा तपासाला येणार
खडसे यांची पुन्हा एकदा एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टाने हे प्रकरण पुन्हा एकदा सविस्तर तपासाला घ्यावं, असे आदेश दिले आहेत.
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील (Pune) भोसरी जमीन प्रकरणाचा पुन्हा एकदा सविस्तर तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा या तपासाला सामोरं जावं लागणार असल्यची शक्यता आहे. महसूल मंत्री असताना पुण्याजवळील भोसरी (Bhosri) येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. या प्रकरणी मला क्लिन चीट मिळाल्याचं एकनाथ खडसे यांनी वारंवार माध्यमांसमोर सांगितलंय, मात्र कोर्टानं पुन्हा एकदा हे प्रकरण तपासण्याचे आदेश दिले आहेत.
एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना 2016मध्ये पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी भागातील 3 एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
लाचलुचपत विभागाच्या वतीने या प्रकरणी खडसे यांची चौकशीही झाली होती. त्यानंतर आपल्याला क्लिन चीट मिळाल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांची पुन्हा एकदा एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टाने हे प्रकरण पुन्हा एकदा सविस्तर तपासाला घ्यावं, असे आदेश दिले आहेत.