‘असाही चमत्कार! मोदीनॉमिक्सचं उफराटं समीकरण, जगात स्वस्ताई, भारतात महागाई’, ‘सामना’तून केंद्र सरकारचे वाभाडे
आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनी दरवाढीची वात आणि महागाईचे दिवे लावण्याशिवाय दुसरे काय केले असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
मुंबई : शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून आज भारतातील महागाईवर सणकून टीका केली आहे. जगात स्वस्ताई असताना भारतातच कशी महागाई आहे, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तसेच हा चमत्कार फक्त मोदीच करू शकतात, अशा शेलक्या शब्दात टीकाही केली आहे. जगात मोदीनॉमिक्सचे ढोल पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या जगात स्वस्ताई आणि भारतात महागाई या उफराट्या समीकरणावर काय म्हणणे आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे. हा चमत्कार फक्त मोदीच करू शकतात, असेच ते म्हणतील आणि स्वतःची पाठही थोपटून घेतील, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हवाल्याने आलेल्या बातम्यांचा हवाला यात देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात जागतिक बाजारात महागाई दर कमी झाला असला तरी भारतात मात्र तो वाढला आहे. यावर केंद्रीय स्तताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
गरजेच्या वस्तूंचे भाव दुप्पट
भारतातील वस्तुस्थितीवर सामनातून बोट ठेवण्यात आले आहे. गॅसची नेहमी होणारी वाढ लोकांच्या अंगवळणी पडली आहे. गॅस, खाद्यतेल, कॉफी, चहा, कापूस इत्यादी रोजच्या जीवनावश्यक 10 वस्तूंचे भाव दुपटीने वाढले आहेत. खतांच्या किंमतीही दुप्पट झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तींनी आधीच शेतकऱ्याचं बजेट कोलमडलं असलं तरी ही स्थिती आहे. जागतिक बाजारातील हे दर तब्बल 48 टक्क्यांनी कमी झाले असताना आपल्याकडे भाव दुप्पट झाले आहेत, यावरून सामनातून टीका करण्यात आली आहे.
जगात २६ टक्के स्वस्त, भारतात ९५ टक्के महाग
खतांच्या किंमती जगात 47.6 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर भारतात 5.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत. नैसर्गिक गॅस जगात 28.6 टक्क्यांनी वाढला असताना भारतात थेट 95 टक्का महागला, हे कसं घडू शकतं, असा सवाल विचारण्यात आलाय. याचं अपश्रेय मोदी सरकारनेच घेतलं पाहिजे, असे ताशेरे सामनातून ओढण्यात आले आहेत.
भारतातल्या महागाईसाठी राज्यकर्ते युक्रेन युद्धाकडे बोट दाखवतात. पण युद्ध चालू असताना जगात महागाई कशी कमी झाली. आपला आणि युक्रेन युद्धाचा फारसा संबंध नाही. तरीही आपल्याकडची महागाई ही मोदी राजवटीचीच देणगी म्हणायला हवी.आठ वर्षांपूर्वी महागाईच्या नावाने ठणाणा करीत जे सत्तेत बसले त्यांनी दरवाढीची वात आणि महागाईचे दिवे लावण्याशिवाय दुसरे काय केले असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.