फडणवीस, तुमच्या मनात आलेय तर… शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून साद
कटुता संपवण्याचा विडा उचला. कामाला लागा असं सामनाच्या अग्रलेखात म्हटल आहे.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीसांना साद घालण्य़ात आली आहे. कटुता संपवण्याचा विडा उचला. कामाला लागा असं सामनाच्या अग्रलेखात म्हटल आहे. सामनात छापून आलेल्या अग्रलेखावरुन काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपलाच चिमटा काढला आहे. भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना राहता कामा नये आणि शिवसेनेतून जे विष बाहेर पडलंय त्या विषाला बासुंदीचा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरु आहे, त्यामुळं कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतील काही लोक लाचार आणि मिंधे केल्यानं सत्ता मिळाली, पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले?
असो. उद्या काय होईल असे जर तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपवण्याचा विडा उचलाच! लागा कामाला! असं सामनामध्ये म्हंटले आहे.
2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. ही कटुता अतिशय टोकाला गेली आहे.
शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे काही नेते तुरुंगात गेले आहेत. त्यामुळंच सामनातून असा अग्रलेख छापण्यात आला असावा अशी चर्चा देखील रंगली आहे.
खरी शिवसेना कोणती हे फडणवीसांना पक्के माहित आहे. त्यांनी गळ्यात जो खरी शिवसेना म्हणून धोंडा बांधून घेतला आहे, तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे. हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज वर्षावर असते, आणि आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो.
उद्धव ठाकरे आणि भाजपमधले संबंध आता विकोप्याला गेले आहेत. ते संबंध पुन्हा सुधारण्याची आशा कुठेही दिसत नाही. अशा परिस्थितीत सामनातून फडणवीसांना साद घालण्यात आलीय. फडणवीस याला कसा प्रतिसाद देणार हेच पाहावे लागेल.