Dada Bhuse : कृषी खात्यावरून थेट बंदरे आणि खनिकर्म खात्यावर बोळवण, दादा भुसे नाराज?
Dada Bhuse : त्या काळात प्रकृतीचे समस्या निर्माण झाल्याने तात्कालीन मुख्यमंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतः इतर कुठलेही खात मला दिला तरी चालेल तसं सांगितलं होतं. त्यामुळे आता मिळालेल्या खात्यावर मी समाधानी आहे.
धुळे: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आता खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपात महत्त्वाचं आणि अपेक्षित खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे (shinde government) अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचं कृषी खातं होतं. मात्र, शिंदे सरकारमध्ये त्यांना बंदरे आणि खनिकर्म हे खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या नाराजीवरून आता सावरासावर केली जात आहे. कोणतंही खातं महत्त्वाचं आणि कोणतंही खातं कमी महत्त्वाचं नसतं. सर्व खाती महत्त्वाची असतात, असं शिंदे गट आणि भाजपकडून सांगितलं जात आहे. तसेच भाजपला (bjp) महत्त्वाची खाती गेल्यानेही शिंदे गटामध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून शिंदे गटाला काही खाती दिली जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
दादा भुसे यांना कमी महत्त्वाचं खातं दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझी तब्येत बरी नसते. प्रवास करणं किंवा दगदग करणं जमत नाही. प्रवासामुळे मला शारिरीक त्रास होत होता. मी गेल्या वर्षभरापासून खातं बदलून देण्याची मागणी केली होती. मागच्या सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आताच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दुसरी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कोणतीही जबाबदारी आपल्याला विश्वासाने दिली जाते त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
खनिकर्म खात्यावर समाधानी
जी काही जबाबदारी देण्यात आलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. या अगोदर कृषी खात्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र फिरून लोकांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. त्या काळात प्रकृतीचे समस्या निर्माण झाल्याने तात्कालीन मुख्यमंत्री आणि आताच्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतः इतर कुठलेही खात मला दिला तरी चालेल तसं सांगितलं होतं. त्यामुळे आता मिळालेल्या खात्यावर मी समाधानी आहे. या खात्याच्या माध्यमातून नागरिकांना आणि इतरांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असं भुसे यांनी सांगितलं. मात्र मंत्री दादा भुसे यांच्या चेहऱ्यावरून त्यांना देण्यात आलेल्या खात्यामुळे ते नाराज असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. दादा भुसे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त धुळे येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
तुम्ही पाहतच आहात
दरम्यान, शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी खाते वाटपावरून शिंदे सरकारला टोले लगावले आहेत. ज्यांना आम्ही मोठ मोठी खाती महाविकास आघाडी सरकारमध्ये दिली, त्यांना आता कमी महत्त्वाच्या खात्यावर समाधान मानावे लागत आहे. दादा भुसे यांना आम्ही कृषी खाते दिले होते. पण त्यांना आता काय मिळालं ते तुम्ही पाहतच आहे. एकंदरीत खाते वाटपात त्यांना काय मिळाले हे तुम्ही पाहतच आहात, असा टोला सचिन अहिर यांनी लगावला आहे.