चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नाशिक | 15 डिसेंबर 2023 : बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण विधासनभेत लावून धरून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. थेट दहशतवाद्याशीच संबंध असल्याचा आरोप झाल्याने सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सार्वजनिक जीवनात वावरत असताना सलीम कुत्ताशी कुठे तरी भेट झाली आहे. मला ते आठवत नाही. किंवा जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो मॉर्फिंग केलेला असेल, असं सांगतानाच पालकमंत्र्यांवरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली बाजू मांडली. पालकमंत्र्यांनी माहिती न घेता सभागृहात आरोप केले आहेत. माहिती घेतली असती तर त्यांनी हे आरोप केले नसते. 2016मध्ये वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा झाली होती. त्याला आम्ही विरोध केला होता. शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. माझ्यावरही गुन्हे होते. मी 15 दिवस तुरुंगात होतो. माझ्यासोबत अनेक लोक तुरुंगात होते. त्यावेळी तुरुंगात बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत हे मला माहीत नव्हतं, असं सांगतानाच मी राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावर साधी एनसीही नव्हती. ज्या काही केसेस आहेत, त्या राजकीय हेतूने दाखल झालेल्या आहेत, असं सुधाकर बडगुजर म्हणाले.
माझं सलीम कुत्ताशी नाव जोडलं गेलं. त्याला 93-93 ला अटक झाली. मला 2016 मध्ये अटक झाली. त्यामुळे त्याच्याशी संबंध येण्याचा प्रश्नच येत नाही. व्हिडीओच्या माध्यमातून बेबनाव करण्यात आला आहे. तो व्हिडीओ मॉर्फिंग केला असावा. ते चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास करा. गुन्हेगार तुरुंगात असेल तर तो बाहेर आला कसा? याची चौकशी व्हावी. तो पॅरोलवर आल्यावर सार्वजनिक जीवनात वावरू शकतो. अशावेळी त्याच्याशी भेट झाली असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो असेल तर माहीत नाही, असं बडगुजर म्हणाले.
राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू असतात. हा बुद्धिबळाचा खेळ असतो. त्यावेळी आम्ही गुन्हे दाखल केले असतील आता त्यांनी आमच्यावर आरोप केले असतील. पण आम्ही पोलिसांना सहकार्य करू. या प्रकरणावर मी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्या मीडियात बोलणार आहेत, असं सांगतानाच दाऊदच्या घरी लग्न झालं, त्याला अनेक लोक गेले. पोलीसही गेले. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचा करार आहे. ज्वॉइंट व्हेंचर आहे. त्याचं काय झालं? आमचा तर करार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
पालकमंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पालकमंत्र्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. एमडी ड्रग्स प्रकरणात तेच आहेत. एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोप त्यांच्या जिव्हारी लागले. आम्ही त्यांच्या विरोधात मोर्चा काढला ते जिव्हारी लागलं. कलंक त्यांच्या माथ्यावर आहे. तो पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते इरिगेशनला जेई म्हणून होते. तिथे निलंबित झाले. त्याचं त्यांनीच आत्मपरीक्षण करावं, असा टोला त्यांनी लगावला.