पुणे : राज्याचे राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता खोचक सल्ला दिलाय. “माझ्या नसानसात काम आहे. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देणार नाही. विरोधकांनी शांतच बसावे,” असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांना लक्ष्य केलं. आज (13 मार्च) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Dattatray Bharane criticize Harshavardhan Jadhav on development of Indapur).
दत्तात्रय भरणे म्हणाले, “इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी माझे उद्दिष्ट खूप मोठे आहे. येणाऱ्या 4 वर्षांच्या काळात मी इंदापूर तालुक्यासाठी विकासाचा महापूर आणणार आहे. मी तालुक्याच्या पाण्याची काळजी घेतली आहे. माझ्या नसानसात काम आहे. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देणार नाही. विरोधकांनी शांतच बसावे. विरोधकांना माझी विनंती एवढीच आहे की चांगल्या कामाचे स्वागत करा आणि आपल्या हातून काही होत नसेल तर आपण विश्रांती घ्या.”
आज इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कश्या पद्धतीने उपाययोजना राबवल्या पाहिजेत ह्याबद्दल सखोल चर्चा झाली.@supriya_sule pic.twitter.com/ZjmHVpXuGg— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) March 13, 2021
‘लाकडी-निंबोडी निरगुडे उपसा सिंचन योजनेची मागणी असूनही होत नव्हती’
” इंदापूर तालुक्यातील गेली 35 वर्ष प्रलंबित लाकडी निबोडी उपसा सिंचन योजना हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्या भागातील दुष्काळी पट्टा म्हणून जो भाग ओळखला जातो. नागरिकांकडून त्याभागातील लाकडी-निंबोडी निरगुडे उपसा सिंचन योजनेची मागणी असूनही ही योजना होत नव्हती. त्यामुळे आता मी स्वतः या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेसाठी प्रयत्न केले व मंजूर केली,” असंही दत्तात्रय भरणे यांनी नमूद केलं.
‘या योजनेच्या माध्यमातून 7200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार’
दत्तात्रय भरणे म्हणाले, “या योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील 11 गावं आणि बारामती तालुक्यातील 5 गावं ओलिताखाली येणार आहेत. साधारणत या योजनेच्या माध्यमातून 7200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेचा फायदा इंदापूर तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.”
‘तीन पिढ्या तालुक्यात पाणी कमी पडू देणार नाही अशा योजना राबवणार’
“माझे उद्दिष्ट खूप मोठे आहे. येणाऱ्या आणि राहिलेल्या 4 वर्षात पाण्यासाठी काम करायचे आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी कसे मिळेल यासाठी माझी ही लढाई सुरू आहे. लाकडी निंबोडी योजना हा तर फक्त ट्रेलर आहे, ‘पिक्चर अभी बाकी है’,” असं म्हणत भरणे यांनी पुढील 100 वर्षे म्हणजेच तीन पिढ्या तालुक्यात पाणी कमी पडू देणार नाही अशा योजना राबवणार असल्याची घोषणा केली.
पुढच्या अधिवेशनात 22 गावांच्या शेतीसाठी पाण्याची योजना मंजूर करणार असल्याचे यावेळी भरणे यांनी सांगितले. त्यावेळी भरणेंनी उजनीतील बुडीत बंधारे, रस्त्यांची कामं तसेच विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणणार असल्याची ग्वाही दिली.
दोन दिवसात रस्त्याबाबत मोठी घोषणा करणार : दत्तात्रय भरणे
“या अधिवेशनात अनेक कामे मार्गी लागलेले आहेत. इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या निधी संदर्भात मोठी घोषणा येत्या 2 दिवसात करणार आहे. इंदापूर तालुक्यातील विकासाच्या कामाची काळजी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः घेतलेली आहे, असंही भरणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं.
हेही वाचा :
मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटलांचा भरणेंना टोला
इंदापुरात अजितदादा म्हणाले, तर समोरच्याचं डिपॉजिट जप्त झालं असतं !
व्हिडीओ पाहा :