वाल्मिक कराडचं खरंच एन्काऊंटर करण्याचा विचार? कासलेंच्या दाव्याबद्दल विचारतच अजितदादा म्हणाले…
निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा केला आहे.

Ajit Pawar : निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर महाराष्ट्रातभर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कासले यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती, असा दावा केला आहे. यावर तुमचं काय मत आहे? असं एका पत्रकाराने विचारलं. यावर उत्तर देताना, मला याबाबत अधिक काही माहिती नाही. मात्र निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचे किती मनावर घ्यायचे हे ठरवायला हवे, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
कासले यांनी नेमका काय दावा केला?
कासले यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ती ऑफर नाकारली. माझ्याकडून असे पाप होणार नाही, असे मी त्यांना सांगितले होते, असा दावा कासले यांनी केला. तसेच एन्काऊंटर करण्यासाठी म्हणाल तेवढी ऑफर दिली जाते. एन्काऊंटरसाठी 10 करोड, 20 करोड, 50 कोटी रुपये दिले जातात, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
मुंडेंना कराड नको होते- कासले
याच कासले यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर करून खळबळजनक दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी प्रयत्न केले होते, असा मोठा दावा कासले यांनी केला आहे. कराड मुंडे यांचे काही प्रकरणं बाहेर काढणार होते. त्यामुळे मुंडेंना करोड नको होते, असंही त्याने म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राऊतांनी केली चौकशीची मागणी
दरम्यान, उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनीही कासले यांच्या विधानाचा हवाला देत राज्य सरकारवर टीका केली होती. कासले यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात आणि देशात फेक एन्काऊंटरर्स झालेले आहेत, याला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे कासले यांच्या विधानाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. त्यामुळे कासलेंच्या दाव्याला चांगलीच हवा मिळाली आहे.