मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली. इस्लामपुरात एका स्थानिक चॅनेलशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. जयंत पाटील यांच्या इच्छेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज मुंबईत पत्रकारांनी बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्या इच्छाला माझा पाठिंबा आहे, असं ‘बोलकं’ उत्तर अजित पवार यांनी दिलं. (DCm Ajit Pawar on jayant patil Over Cm Statement)
गेली 25 ते 30 वर्ष मी राजकारणात काम करतोय. माझं मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं महत्त्वाचं आणि मोठं विधान जयंत पाटील यांनी केलं. पाटलांच्या याच विधानावर अजित पवार यांना पत्रकारांनी छेडलं असता अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील साहेबांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, त्या इच्छेला मी पाठिंबा देतो”.
जयंत पाटील यांनी एका चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध प्रकारचे राजकीय प्रश्न विचारण्यात आले. मुख्यमंत्रिपदाविषयी विचारल्यानंतर त्यांनी त्यांचं अनेक वर्षांपासून असलेलं स्वप्न महाराष्ट्रासमोर जाहीरपणाने मांडलं.
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी जास्त संख्याबळाची, पक्षवाढीची गरज असते. त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले. मला हे माहितीय की आमच्याकडे 54 आमदार आहे. 54 आमदारांचा कसा मुख्यमंत्री होणार? त्यासाठी पक्षवाढीची अतोनात गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात असल्याचं ते त्यांनी सांगितलं.
यावेळी पाटील यांनी तरूणांना राजकीय यशाचा कानमंत्रही दिला. तरूणांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी फक्त पोस्टरबाजी करून चालणार नाही. त्यांना जनतेत उतरून काम करावं लागेल, असा सल्ला त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुमारे डझनभर नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. त्यामुळे जयंत पाटील मुख्यमंत्री होती का? याबाबत राजकीय निरीक्षकांच्या मनात साशंकता आहे. राष्ट्रवादीत अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आदी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले अनेक चेहरे आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदात अनेक अडथळे असल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.
हे ही वाचा
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट