सरकारी अनास्थेचा बळी, 13 वर्षीय मुलीचा पाण्यासाठी मुत्यू
धुळे : जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. अनेक खेड्यांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरु आहे. अनेकवेळा तर हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागत आहे. प्रसंगी जीवही जातो आहे. असाच एक प्रकार धुळ्यातील मोरदड तांडा गावात घडला. पाण्याच्या शोधात निघालेल्या 13 वर्षीय नंदिनी पवार हिचा 2 दिवसांपूर्वीच गावाजवळ असलेल्या 50 फूट विहिरीत पडून मृत्यू झाला. […]
धुळे : जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. अनेक खेड्यांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरु आहे. अनेकवेळा तर हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकावा लागत आहे. प्रसंगी जीवही जातो आहे. असाच एक प्रकार धुळ्यातील मोरदड तांडा गावात घडला.
पाण्याच्या शोधात निघालेल्या 13 वर्षीय नंदिनी पवार हिचा 2 दिवसांपूर्वीच गावाजवळ असलेल्या 50 फूट विहिरीत पडून मृत्यू झाला. ती विहिरीतून पाणी काढत असताना तिचा पाय घसरला आणि तोल जाऊन ती विहिरीत पडली. त्या विहिरीत बुडून तिचा जीव गेला. या घटनेनंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरी हक्क संरक्षण समितीचे महेश घुगे यांनी केली आहे.
मोरदड तांडा हे बंजारा समाजाचे गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास 4000 आहे. गावात सरकारी यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे नंदिनीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. नंदिनीच्या कुटुंबीयांना या घटनेने अगदीच धक्का बसला. आई, वडील, आजी यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबायला तयार नाहीत. तिचे शाळेचे दफ्तर पाहून ते आठवणीने व्याकुळ होत आहेत. नंदिनीची लहान बहीण तिच्या फोटोशी खेळत आहे. आपली बहीण मामाच्या गावी गेलीय असंच तिला वाटतंय.
नेमकं काय झालं?
नंदिनी दुपारी घरात पाणी नसल्याने हंडा घेऊन गावाजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला पण ती परत आली नाही. म्हणून तिची आजी त्या विहीरजवळ गेली, तर नंदिनीची चप्पल विहिरीमध्ये दिसली. त्यानंतर आजीने जीवाचा आकांत करत गावकऱ्यांना गोळा केले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. नंदिनीने आपला जीव सोडला होता. ही बातमी वाऱ्या सारखी परिसरात पसरली आणि परिसरात एकच हळहळ व्यक्त झाली.
‘सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे योजना पूर्ण झाली नाही’
गावात मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली आहे. परंतु गावातील काही लोकांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे योजना पूर्ण झाली नाही. अशात गावात दुष्काळ उभा राहिला. गावात सध्या फक्त 2 टँकर पाणी पुरवठा होत आहे. ज्या ठिकाणी 5 टँकरची गरज आहे त्या ठिकाणी 2 टँकर अगदी अपुरे पडत आहेत. नागरिकांना 50 रुपये बॅरेलप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. योजना मंजूर झाली तरी भ्रष्टाचार करुन ग्रामसेवक, तलाठी आणि इतर अधिकारी कामाची टाळाटाळ करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गावातील महिलांना आजही कोसो दूर जाऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते. कठडे नसलेल्या विहिरीतून नाइलाजाने त्यांना जीव धोक्यात टाकून विहिरीतून पाणी काढावं लागतं. आज गावात पाण्याचा थेंब नाही. शेतकऱ्यांची जनावरं चारा आणि पाण्यासाठी तडफडत आहेत. सरकारने याचं भान ठेवत गावकाऱ्यांची तहान भागवली पाहिजे. नाही तर पुन्हा कुठल्या ना कुठल्या गावात पुन्हा एक ‘नंदिनी’ आपला जीव गमावून बसेल.
संबंधित बातम्या :
मोहखेडमध्ये प्यायला पाणी नाही, मुख्यमंत्री म्हणतात ‘पाणीदार गाव’!
महाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप